'हॉर्न ओके प्लीज' भोवणार, परिवन खात्याकडून कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2015 12:40 PM2015-05-01T12:40:05+5:302015-05-01T12:43:21+5:30
वाहनांच्या मागील बाजूस ‘हॉर्न ओके प्लीज’ असा संदेश लिहून हॉर्न केव्हाही वाजविणे योग्य असल्याचा चुकीचा संदेश देणा-या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
मुंबई : वाहनांच्या मागील बाजूस ‘हॉर्न ओके प्लीज’ असा संदेश लिहून हॉर्न केव्हाही वाजविणे योग्य असल्याचा चुकीचा संदेश देणा-या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. परिवहन विभागाकडून ही कारवाई केली जाणार असून तसे आदेश सर्व आरटीओंना देण्यात आले आहे.
बऱ्याच ट्रक आणि बसच्या मागील बाजूस ‘हॉर्न ओके प्लीज’असा संदेश असतो. असा संदेश प्रदर्शित करणे हे केवळ महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम १९८९ च्या नियम १३४ (१) मधील तरतुदीचा भंग करणारे नसून, हॉर्न केव्हाही वाजविणे योग्य असल्याबाबत चुकीचा संदेश जात असल्याचे अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्रबुद्धे यांनी सांगितले. त्यामुळे हा संदेश प्रदर्शित केलेल्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी उचित कारवाई करावी आणि संदेश संबंधित वाहतूकदाराकडून जागीच काढून टाकण्यात यावा, असे आदेश आरटीओंना दिल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)