थरार अवघ्या काही तासांवर; मँचेस्टरमध्ये उत्साह शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 12:16 PM2019-07-09T12:16:12+5:302019-07-09T13:06:13+5:30
थोड्याच वेळात मँचेस्टरच्या ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे.
सुकृत करंदीकर-
मँचेस्टर : विराट कोहलीचा भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटचा विश्वविजेता होण्यापासून अवघे दोन पावले दूर आहे. थोड्याच वेळात मँचेस्टरच्या ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या मैदानावर ढगांची छाया असल्याने विरस होतो की काय अशी शंका आहे.
स्थानिक हवामान खात्यानेही दिवसात अनेकदा रिमझिम पावसाची शक्यता वर्तवली आहे. दिवसाची सुरुवात फक्त 14 अंश तापमानाने झाली असून बोचरी थंडी आहे. अर्थात स्थानिक इंग्लिश मंडळी याला 'उबदार' म्हणत आहेत. न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनाही हे वातावरण सवयीचे असले तरी भारतीय खेळाडूंना या इंग्लिश वातावरणालाही तोंड द्यावे लागेल. दुपारच्या वेळी तापमान 19-20 अंशापर्यंत जाईल आणि अधूनमधून पावसाच्या सरी येतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पावसाच्या शक्यतेमुळे 'डकवर्थ-लुईस' महाशय सामन्याच्या निकालात लुडबूड करू शकतात. अर्थात सामन्याचा वेळ खाईल इतका पाऊस पडणार नाही, असा अंदाज असल्याने ही शक्यता अंधूक आहे. उपांत्य फेरीचा सामना असल्याने संपूर्ण दिवस भराचा खेळ वाया गेला तरी उद्याचा (दि. 10) दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र दोन्ही संघांचे खेळाडू आणि चाहत्यांची इच्छा आजचा खेळ निर्धोक पार पडावा अशीच असेल.
'विराट सेने'चा खेळ पाहण्यासाठी जगभरातून आलेल्या क्रिकेटप्रेमींच्या रांगा सकाळी साडेसातपासूनच (स्थानिक वेळ) 'ओल्ड ट्रॅफर्ड'च्या दिशेने लागल्या आहेत. तिकीट न मिळलेल्यांची संख्याही मोठी आहे. भारतीय चलनात अगदी 30 40 हजार रुपये मोजून ऐनवेळचे तिकीट खरेदी करण्याची तयारी या मंडळींनी ठेवली आहे.
प्रचंड प्रतिसाद
उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांच्या तिकिटासाठी जगभरातून साडे सहा लाखांहून अधिक चाहत्यांनी अर्ज केले होते. या तुडूंब प्रतिसादामुळे मे 2018 मध्येच तिकीट विक्री संपली, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. इंग्लंडमधल्या मैदानांची प्रेक्षक क्षमता तुलनेने कमी असल्याने लाखो चाहत्यांचा हिरमोड झालेला दिसतो आहे. आपला संघ उपांत्य फेरीत खेळेल या आशेने आगाऊ तिकीट खरेदी केलेल्या अनेक चाहत्यांनाही निराश व्हावे लागले आहे. भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्तान या आशियाई देशांमधील नागरिकांची संख्या इंग्लडमध्ये लक्षणीय आहे. मात्र यापैकी भारतानेच उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे स्पधेर्तून बाहेर फेकलेल्या इतर पाच आशियाई देशांच्या चाहत्यांकडून तिकिटे मिळवण्याचा भारतीय चाहत्यांचा प्रयत्न आहे.
भारतीय चाहत्यांच्या गदीर्पुढे न्यूझीलंडच्या पाठीराख्यांची संख्या अगदीच नगण्य असल्याने मैदानात 'निळी लाट' उसळणार हे नक्की आहे. त्यामुळे वातावरणाचा अपवाद वगळता हा सामना मुंबई-चेन्नईतच खेळला जात असल्याचा भास भारतीय संघाला होणार हे नक्की. ओल्ड ट्रॅफर्डची प्रेक्षक क्षमता जेमतेम 28 हजार आहे. प्रेक्षकांना पिकॅडली रेल्वे स्थानकापासून मैदानावर घेऊन जाणा?्या जादा ट्रामची व्यवस्था करण्यात आली आहे.
भारतच 'हॉट फेव्हरिट'
ओल्ड ट्रॅफर्डचं वैशिष्ट म्हणजे येथे सन 1857 पासून क्रिकेट खेळले जात आहे. यंदाच्या विश्वचषकात भारताने याच मैदानावर पाकिस्तानला धूळ चारली. इंग्लंडविरुद्धचा एक पराभव वगळता भारत संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला आहे. तीन पराभव स्वीकारलेल्या न्यूझीलंडचा उपांत्य फेरीतला प्रवेश मात्र कसाबसा झालेला आहे. साखळी फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना पावसाने वाहून नेल्याने दोघांनाही एकमेकांना आजमावण्याची संधी मिळालेली नाही. सर्वोत्तम सूर गवसलेला रोहित, सातत्यपूर्ण विराट आणि भेदक मारा करणा?्या भुमरा-भुवनेश्वर यांच्यामुळे सर्वांची पसंती मात्र भारतालाच आहे. अर्थात क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस नवा असतो आणि इतिहासाला येथे शून्य स्थान असते. न्यूझीलंडचा स्फोटक सलामीवीर मार्टिन गुप्तीलची बॅट या स्पर्धेत अद्याप तळपलेली नाही. 'बिग मॅच प्लेयर' म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. 2015 च्या
विश्वचषकात वेलींग्टनच्या मैदानात त्याने एकट्याने 237 धावांचा पाऊस पाडला होता. जागतिक क्रिकेटमधल्या 'बिग फोर'पैकी एक केन विल्यम्सन या स्पर्धेत न्यूझीलंडचा तारणहार ठरला आहे. या दोघांना भारताला रोखावे लागेल. तर ट्रेंट बोल्टची डावखुरी कोशल्यपूर्ण गोलंदाजी आणि मॅट हेन्रीच्या वेगाचा सामना ढगाळ हवेत भारतीय फलंदाजांना नेटाने करावा लागेल. त्यामुळे सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट म्हणाला त्याप्रमाणे मोक्याच्या क्षणी धिटाई दाखवणारा संघच बाजी मारून जाईल. हा थरार आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.
-----------(समाप्त)-----------