महापौर पदासाठी घोडेबाजार तेजीत...

By Admin | Published: January 17, 2016 11:58 PM2016-01-17T23:58:14+5:302016-01-18T00:39:58+5:30

मताचा दर वाढला : काँग्रेस नेत्यांसह इच्छुकांना डोकेदुखी; लाखापासून पंधरा लाखांपर्यंत मागणी

The horse box for the post of Mayor ... | महापौर पदासाठी घोडेबाजार तेजीत...

महापौर पदासाठी घोडेबाजार तेजीत...

googlenewsNext

शीतल पाटील --सांगली -महापालिकेच्या महापौर पदासाठी कधी नव्हे इतकी चुरस निर्माण झाली आहे. यापूर्वी नेत्यांचा शब्द प्रमाण मानणारे नगरसेवक आता नेत्यांना डावलून लक्ष्मीदर्शनासाठी उत्सुक आहेत. महापौर निवडीसाठी मतांचा घाऊक बाजार तेजीत आला आहे. प्रत्येक गटाने आतापासूनच मताचा दर ठरविला आहे. जास्तीत जास्त दर देण्याऱ्याला पाठिंबा, असे सूत्र तयार झाले आहे. यात केवळ सत्ताधारी काँग्रेसचेच नगरसेवक नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीमधील नगरसेवकांनीही मतांचा लिलाव सुरू केला आहे. अर्थपूर्ण घडामोडींमुळे यंदाची महापौर पदाची निवडणूक इच्छुकांसाठी चांगलीच महागात पडणार असे दिसते. सांगली महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर-उपमहापौर निवडीसाठी पैशांचा बाजार गरम होणार आहे. तशी चर्चा आता नगरसेवक उघडपणे करीत आहेत. यापूर्वी असा प्रकार कधी फारसा घडलेला नव्हता. महापालिकेच्या स्थापनेपासून पाच वर्षांचा कालावधी वगळता, काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. मध्यंतरी पाच वर्षे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास महाआघाडीने महापालिकेची सूत्रे सांभाळली होती. गेल्या अठरा वर्षात महापालिकेत दहा महापौर, उपमहापौर झाले. पण अर्थपूर्ण तडजोडीची चर्चा कधीच झाली नव्हती. किरकोळ स्वरुपात नगरसेवकांचे खिसे गरम केले जात होते. पण तेही नेत्यांच्या इशाऱ्यावर!महापालिकेत काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. पण मदनभाऊंच्या निधनानंतर काँग्रेसला गटा-तटाचे ग्रहण लागले आहे. मदनभाऊंच्या हयातीत त्यांच्या शब्दापलीकडे जाण्याची हिंमत नगरसेवकांत नव्हती. महापौर, उपमहापौरापासून ते अगदी सभापती निवडीपर्यंत साऱ्याच पदांच्या उमेदवारीचा निर्णय झाला की, नगरसेवक निमूटपणे तो मान्य करीत. प्रसंगी पदासाठी इच्छुक असलेले नाराज होत, पण नेत्यांच्या आदेशाविरोधात जाऊन बंडखोरी अथवा आर्थिक तडजोडी केल्या जात नव्हत्या. पण आता महापालिकेत सारेच काही बदलले आहे. दबाव गटाच्या नावाखाली काही नगरसेवक एकत्र आले आहेत. सर्वच पक्षांत उघडपणे गट पडले आहेत. त्यातून अर्थपूर्ण तडजोडीला वेग आला आहे. त्यात महापौर पदाची निवडणूक म्हणजे एक मोठी संधी मानून हे गट कार्यरत झाले आहेत. महापौर पदासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांशी बोलणी सुरू आहेत. कोण किती देणार?, आमच्या गटाचा रेट काय? अशी चर्चा सुरू आहे.
अगदी लाखापासून ते पंधरा लाखांपर्यंत मताचा दर निघू लागला आहे. मताचा घाऊक बाजार तेजीत आल्याने नगरसेवकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. नगरसेवकांना एकसंध ठेवण्याचे आव्हान सर्वच पक्षाच्या नेत्यांसमोर आहे. हे आव्हान कसे पेलतात, यावर बरीच गणिते अवलंबून आहे.


नगरसेवक म्हणतात : दाग अच्छे है!
अडीच वर्षापूर्वी महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी मोठा खर्च केला आहे. एकेका नगरसेवकांचा खर्च ३५ लाखांच्या घरात गेला आहे. निवडणूक आयोगाकडे जरी मर्यादित खर्च सादर केला असला, तरी वस्तुस्थिती निश्चित वेगळी आहे. नगरसेवक झाल्यापासून त्यांच्या पदरात फारसे काही पडलेले नाही. त्यामुळे आजकाल हे नगरसेवक प्रत्येक संधीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात महापौरपदाची निवडणूक म्हणजे त्यांच्यासाठी कुबेराचा खजिनाच! त्यासाठी आपल्यावर काही शिंतोडे उडले, डाग पडले तरी चालेल, अशीच भूमिका नगरसेवकांची आहे. दबाव गटातील नगरसेवक तर ‘दाग अच्छे है’, असे म्हणत त्याचे समर्थन करीत आहेत.

हारुण शिकलगारांचे शक्तिप्रदर्शन सुरूच
महापौरपदाचे इच्छुक उमेदवार हारुण शिकलगार यांनी सलग दुसऱ्यादिवशी शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांची भेट घेऊन शिकलगार यांना संधी देण्याची मागणी केली. इतर इच्छुक सुरेश आवटी, राजेश नाईक यांनीही फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: The horse box for the post of Mayor ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.