बेलवाडीत रंगले अश्व रिंगण
By admin | Published: June 27, 2017 01:54 AM2017-06-27T01:54:24+5:302017-06-27T01:54:24+5:30
वारीमध्ये चालण्यासाठी बळ देणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ मृदंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती (पुणे) : वारीमध्ये चालण्यासाठी बळ देणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ मृदंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष लहान-थोरांचा दांडगा उत्साह रिंगण सोहळ्याची भव्यता वाढवतो.
भान हरपून खेळ खेळतो,दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा..
भक्तिने भारलेला रिंगण सोहळा
पाहावा याचि देही याचि डोळा
अशा भक्तीभावाने जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
सणसर येथील मुक्कमानंतर तुकोबारायांचा पालखी सोहळा पहिल्या अश्व रिंगणासाठी बेलवाडी येथे विसावला. अश्व रिंगण सोहळ््याची सुरूवात शहाजी मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांचे रिंगण झाल्यावर झाली. त्यानंतर टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकऱ्याचे रिंगण झाले. मानाच्या अश्व रिंगणाला सुरूवात होताच उपस्थित लाखो भाविकांनी ‘ज्ञानोबा-तुकोबां’चा जयघोष केला.
लासुर्णेत तोफांची सलामी-
बेलवाडीचे पहिले अश्व रिंगण झाल्यानंतर पालखी सोहळा निमगाव केतकी येथे मुक्कामी मार्गस्थ झाला. दुपारी पावसांच्या सरी झेलत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे लासुर्णे येथे आगमन झाले.
बार्शीत गुलाबराव महाराज पालखीचे स्वागत
बार्शी (सोलापूर) : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथून पंढरीकडे निघालेल्या श्री संत गुलाबराव महाराज पालखीचे बार्शीत स्वागत करण्यात आले. चाळीस वर्षांपासून वायकुळे परिवाराकडून वारकऱ्यांची सेवा अखंडपणे सुरु आहे.