अश्व धावले रिंगणी, झाला टाळ-मृदंगाचा ध्वनी
By admin | Published: July 11, 2016 12:30 AM2016-07-11T00:30:44+5:302016-07-11T00:30:44+5:30
‘अश्व धावले रिंगणी, झाला टाळ- मृदंगाचा ध्वनी’ या अभंगाची साक्ष देत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य प्रांगणात
राजीव लोहकरे, अकलूज
‘अश्व धावले रिंगणी, झाला टाळ- मृदंगाचा ध्वनी’ या अभंगाची साक्ष देत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य प्रांगणात देवाच्या व स्वाराच्या अश्वाने नेत्रदीपक दौड करीत लाखो वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
प्रारंभी सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुका नीरा स्नानासाठी नेण्यात आल्या, परंतु नीरा नदीमध्ये पाणी नसल्याने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना टँकरद्वारे स्नान घालण्यात आले. त्यानंतर पालखी अकलूजकडे मार्गस्थ झाली.
संततधार पावसामुळे रिंगण होणार की नाही? याबाबत शंका होती परंतु सदाशिवराव माने विद्यालयाने रिंगणासाठी आखीव रेखीव मैदान तयार केले होते. त्यानंतर मैदानावर मधोमध पालखी ठेवून वारकऱ्यांनी गोल रिंगण केले.
टाळ, मृदंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषात सकाळी रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. पताकाधारी, पखवाज व टाळकरी, तुळशीवृंदावनधारी व हांडेवाल्या महिला, वीणेकरी यांना एकापाठोपाठ एक रिंगणासाठी सोडण्यात आले. त्यांनी तुकाराम-तुकाराम असा नामघोष करीत एक रिंगण पूर्ण केले. टाळ, मृदंगाच्या गजरात चैतन्य निर्माण झाले. त्यानंतर देवाच्या अश्वास रिंगणासाठी सोडण्यात आले. या अश्वाने एक रिंगण पूर्ण करून स्वाराच्या अश्वासह दौडीस सुरुवात केली. पाहता पाहता दोन्ही अश्वांनी नेत्रदीपक दौड करून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्वांच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा पूर्ण झाला.
यावेळी भाविकांनी पारंपरिक पद्धतीचे खेळ खेळले. झिम्मा, फुगडी, हुतूतू हे मैदानी खेळ रंगले. रिंगणानंतर सोहळा अकलूज येथील विठ्ठल मंदिरात विसावला. सोमवारी माळीनगर येथे सोहळ्यातील उभे रिंगण होईल.
(वार्ताहर)