पुण्यात ‘घोडा’बाजार तेजीत
By Admin | Published: August 8, 2016 01:32 AM2016-08-08T01:32:12+5:302016-08-08T01:32:12+5:30
एक संगणक अभियंता स्वत:च्या पत्नीचा खून करण्यासाठी चक्क बेकायदा पिस्तूल वापरतो, ही घटना पोलिसांना हादरवून गेली आहे.
पुणे : एक संगणक अभियंता स्वत:च्या पत्नीचा खून करण्यासाठी चक्क बेकायदा पिस्तूल वापरतो, ही घटना पोलिसांना हादरवून गेली आहे. एरवी गुन्हेगारांच्या हातामध्ये दिसणारी बेकायदा पिस्तूल आणि गावठी कट्ट्यांचा वापर उच्चशिक्षितांकडून होऊ लागल्यामुळे या बेकायदा शस्त्रांच्या तस्करीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहआयुक्त सुनील रामानंद यांनी पोलिसांना ही तस्करी मोडून काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यात फोफावत चाललेला हा ‘घोडा’बाजार सध्या तरी तेजीत असल्याचे चित्र आहे.
मागील काही वर्षांपासून बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून शेकडो बेकायदा पिस्तूल पुण्यामध्ये येऊ लागली आहेत.
पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये केलेल्या विविध कारवायांमध्ये ७० पिस्तूल आणि १३८ काडतुसे जप्त केली आहेत. यामध्ये ७७ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या घटना चिंताजनक आहेतच, परंतु भविष्यातील संकटाची चाहूल देणाऱ्या आहेत.
पोलिसांनीही गुन्हेगारांच्या गोळीला गोळीनेच प्रत्युतर देत
गेल्या २८ वर्षांत विविध चकमकींमध्ये २७ गुन्हेगारांचा खात्मा केलेला आहे.
गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा पिस्तुलांचा वापर सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात पुणे शहर आणि जिल्ह्यामधील गुन्हेगारांनी मुंबईतील टोळ्यांकडून शस्त्रे आणायला सुरुवात केली. कालांतराने थेट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्ये संधान साधत शस्त्रांची तस्करी सुरू झाली. या राज्यांमधल्या बेकायदा शस्त्र निर्मात्यांनी महाराष्ट्रात त्यांचे तस्कर नेमले.
शहरी आणि ग्रामीण भागातील किशोरवयीनांपासून ते लँडमाफिया, बांधकाम व्यावसायिक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे काही कार्यकर्तेही या शस्त्रांच्या प्रेमात पडलेले आहेत. ‘भाई’ होण्याची खुमखुमी, पैशांचा हव्यास आणी मानसिक ताणतणाव यामुळे या शस्त्रांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
(प्रतिनिधी)
कशी येतात
ही शस्त्रे राज्यात?
रेल्वे, खासगी वाहने आणि प्रवासी बसेसमधून ही शस्त्रास्त्रे शहरामध्ये आणण्यात येतात. त्यांच्यावर कुठेही पोलिसांचा ‘चेक’ नसतो. पुण्यामधून थेट उत्तर भारतामध्ये जाऊन तेथून मोठ्या प्रमाणावर शस्त्र खरेदी करून आणली जातात. ही वाहने कोठेही तपासली जात नाहीत. विशेषत: प्रवासी बसेस, रेल्वे गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यांची कोठेही तपासणी होत नसल्याचा फायदा शस्त्रतस्करांना होत आहे.