फळबागांना रोगांच्या प्रादुर्भावाचा धोका
By admin | Published: June 10, 2016 01:36 AM2016-06-10T01:36:42+5:302016-06-10T01:36:42+5:30
तापमानातील स्थिरता, आर्द्रतेतील वाढ यामुळे द्राक्ष, डाळिंब बागांवर, बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते
इंदापूर : पूर्वमोसमी पावसास सुरुवात झाल्याने तापमानातील स्थिरता, आर्द्रतेतील वाढ यामुळे द्राक्ष, डाळिंब बागांवर, बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी बुरशीनाशक फवारण्या फळबागांवर करण्याची गरज आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी दिली.
या वातावरणात डाळिंबावर तेल्या रोग पडण्याची दाट शक्यता असते. तो रोग येण्याआधीच कॉपर आॅक्सोक्लोराईड किंवा झायमन या बुरशीनाशकाबरोबर स्ट्रेप्टोसायक्लिनची फवारणी करावी. तेल्याचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर अर्धा टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तयार करावे. सद्यस्थितीतील तापमान, आर्द्रतेमुळे द्राक्षावर केवडा, भुरी, करपा, विषाणूजन्य करपा आदी रोगांची शक्यता वाढते. प्रतिबंधात्मक फवारण्या घेणे गरजेचे असते. करपा व केवड्याच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब किंवा कॉपर आॅक्सिक्लोराईडची फवारणी घेणे आवश्यक असते. जिवाणूजन्य करप्यासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशकाबरोबर स्ट्रेप्टोसायक्लिन फवारावे. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्साकोन झोल किंवा सल्फरची फवारणी करावी. द्राक्षाची काडी पक्व झाली असल्यास बोर्डो मिश्रण अर्धा ते एक टक्क्यांपर्यंत फवारले तरी चालेल, पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी जैविक उत्पादने सकाळी दहा वाजण्याच्या आत किंवा सायंकाळी पाचनंतर देणे महत्त्वाचे आहे. ती ताजी बनवलेली व नामांकित कंपनीची असावीत, असे त्यांनी सांगितले.
पूर्वहंगामी पावसामुळे तापमान २६ अंश सेल्सिअस ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहते. आर्द्रतेमध्ये वाढ होते. त्यामुळे द्राक्ष व डाळिंब बागांवर वेगवेगळे बुरशीजन्य व विषाणूजन्य रोग होण्याची शक्यता असते. कृषी विद्यापीठे, राष्ट्रीय द्राक्ष व डाळिंब संशोधन केंद्रांच्या शिफारशीनुसार योग्य त्याच कीटकनाशके, बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्यास रोग आटोक्यात येतील.
- राजेंद्र वाघमोडे, संचालक