जेजुरीच्या खंडेरायाच्या नावे पश्चिम महाराष्ट्रातही बागायती जमिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 01:44 PM2019-11-11T13:44:14+5:302019-11-11T13:56:50+5:30
जेजुरीच्या खंडेरायाच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये करोडो रुपये किमतीच्या बागायती जमिनी असल्याची माहिती आता उघड होत आहे...
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये करोडो रुपये किमतीच्या बागायती जमिनी असल्याची माहिती आता उघड होत आहे. या जमिनी पूर्वीच्या काळातील भाविक-भक्तांनी देणगीद्वारे खंडेरायाचरणी दिलेल्या इनाम वतन वर्ग एक, दोन, तीन या वर्गवारीत असल्याचे समजते.
विश्वस्त मंडळाने या जमिनींबाबत माहिती संकलित करून नोंदी, ७/१२ उतारे व फेरफार उतारे नकाशांच्या नकला मिळविण्याचे काम सुरु केले आहे. या कामाला यश मिळत आहे. मात्र, मागील काळातील विश्वस्त मंडळींना काही जमिनींचा अपवाद वगळता कोणतीही माहिती उपलब्ध झाली नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे देवसंस्थानकडे स्थावर जंगम मालमत्तेचे कोणतेही दप्तर अथवा नोंदी नसल्याने शेतजमिनी शोधण्यात अडथळा निर्माण होत आहे. केवळ ऐकीव माहितीच्या आधारेच जमिनी शोधण्याचे काम सध्या सुरु आहे.
श्री खंडोबा देव, श्री मार्तंड देव, श्री मल्हारी देव जेजुरी या नावे ७/१२ उताऱ्यावर नोंदी असलेल्या जमिनी पश्चिम महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील गावांमध्ये आढळून येत असल्या तरी ताबा व कसणारे इतर किंवा तेथील स्थानिक शेतकरी आहेत. विशेष म्हणजे या जमिनी बागायती असून कसणारे व ताबा असलेले शेतकरी देवसंस्थानला कसलेही उत्पन्न देत नाहीत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, (सणसर, तरंगवाडी), फलटण, (सांगवी) पुरंदर (पिसर्वे) येथे देवसंस्थानच्या मालकीच्या शेतजमिनी असून दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात, फलटण तालुक्यातील गिरवी या गावी कोट्यवधी रुपयांची शेतजमीन खंडोबा देवाची असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सदरील जमिनींची कागदपत्रे देवसंस्थान विश्वस्त मंडळाने उपलब्ध केली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये महसूल प्रशासनाकडून खंडेरायाच्या इनाम वर्ग जमिनींची माहिती ‘माहिती अधिकार’ कायद्यात मागविली आहे. याबाबत माहिती देताना देवसंस्थान विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी ७ विश्वस्तांची नियुक्ती धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून केली. भाविकांच्या सोई सुविधांचे व सामाजिक हिताचे अनेक निर्णय घेतले. त्याचबरोबर सध्याच्या विश्वस्त मंडळाने उत्पन्न वाढीवरही लक्ष केंद्रित केले. त्याच माध्यमातून देवसंस्थानच्या इनाम वर्गातील जमिनी काही ठिकाणी असल्याची माहिती मिळाली व कागदपत्रे उपलब्ध करण्यास सुरुवात केली. त्याद्वारे खेड तालुक्यामध्ये ११ एकर व फलटण तालुक्यामध्ये १३ एकर जमीन मल्हारी मार्तंडाची असल्याची कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतजमिनीच्या बाबत सध्या माहिती घेण्याचे व कागदपत्रे उपलब्ध करण्याचे काम विश्वस्त मंडळ करीत आहे. किमान शेकडो एकर जमीन जेजुरीच्या खंडेरायाची असावी असे म्हणल्यास वावगे ठरू नये.
...........
सद्य:स्थितीमध्ये चार तालुक्यांमध्ये माहितीचा अधिकाराचा वापर केला आहे. या जमिनीमधून देवसंस्थानला कोणतेही उत्पन्न मिळत नाही. तसेच सध्याच्या विश्वस्त मंडळाने जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांकडे देवसंस्थानला उत्पन्न देण्याची मागणी केली होती. तशा बैठकाही मागील काळात झाल्या होत्या. परंतु, शेतकऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पुढील काळात पश्चिम महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या खंडेरायाच्या जमिनी व सद्य: स्थितीतील जमिनीमधून देवस्थानला उत्पन्न मिळण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.
...
खंडेराया हे प्राचीन दैवत असून ते कष्टकºयांचे, बळीराजा, सरदार, दरकदार, राजे-महाराजे यांचे कुलदैवत असल्याने या घराण्यांकडून विविध गावातील जमिनी इनाम वतनाद्वारे खंडेरायाच्या चरणी आल्या असाव्यात.
...
देवसंस्थानकडे याबाबत कोणतेही रेकॉर्ड नसल्याने ऐकीव माहितीच्या आधारे किंवा माहिती उपलब्ध झाल्यांनतरच संबंधित ठिकाणी महसूल विभागाकडे जाऊन कागदपत्रे प्राप्त करून घेण्याचे काम विश्वस्त मंडळाला करावे लागत आहे.