गारपीटग्रस्तांना व्याज माफ होणार!
By admin | Published: July 25, 2014 12:20 AM2014-07-25T00:20:47+5:302014-07-25T00:20:47+5:30
सुधारित पत्रक : शेतकर्यांना दिलासा
खामगाव : गत फेब्रुवारी व मार्च महिन्यातील गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतकर्यांच्या पीक कर्जावरील डिसेंबर २0१४ पर्यंतचे व्याज माफ होणार आहे.
शासनाने २२ मार्च रोजी काढलेल्या आदेशामध्ये, जे गारपीटग्रस्त शेतकरी ३0 जून २0१४ पर्यंत पीक कर्जाची परतफेड करतील, त्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी घेतलेल्या पीक कर्जाच्या परतफेडीच्या दिनांकापर्यंतचे व्याज शासनामार्फत संबंधित बँकेस अदा करण्यात येईल, असे नमूद केले होते. मात्र आदेश सुस्पष्ट नसल्याने बँका, तसेच शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानुसार ११ जुलै रोजी सुधारित शासन आदेश निर्गमित करण्यात आला. नव्या आदेशानुसार, जे गारपीटग्रस्त शेतकरी ३१ डिसेंबर २0१४ पर्यंत पीक कर्जाची परतफेड करतील, अशा शेतकर्यांनी नुकसान झालेल्या पिकासाठी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या दिनांकापर्यंतचे व्याज शासनामार्फत संबंधित बँकेस अदा करण्यात येणार आहे.
त्याशिवाय ज्या शेतकर्यांनी पीक कर्जाची परतफेड मुदतीच्या आत केली असेल, त्यांना केंद्र शासनाकडील प्रोत्साहनात्मक व्याज सवलतीचा व राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभही मिळणार आहे. या लाभाची रक्कम पीक कर्जावरील व्याज रकमेमध्ये समायोजित केली जाणार आहे. मात्र यावर्षी पाऊस दोन महिने लांबला आहे.
त्यामुळे पीक नियोजन कोलमडले आहे. आता येईल त्याच पिकाची पेरणी करावी लागेल. तर डिसेंबर पूर्वी पिक घरात आल्यासच शेतकर्यांच्या हाती पैसा येणार आहे.