राज्यासह मुंबईत गारठा कमालीचा वाढला
By admin | Published: January 12, 2015 03:35 AM2015-01-12T03:35:30+5:302015-01-12T03:35:30+5:30
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट कायम
मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट कायम असून, पुढील २४ तासांत मराठवाड्यालादेखील थंड लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईच्या किमान तापमानातही चढ-उतार नोंदविण्यात येत असून,
रविवारी शहराचे किमान तापमान
१४ अंश सेल्सिअस एवढे
नोंदविण्यात आल्याने मुंबईकरही गारठले आहेत.
पंधराएक दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसादरम्यान उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर ओसरला होता. परिणामी, राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानाचा पारा चढला होता. शिवाय थंडीचा जोर किंचितसा ओसरला होता.
मात्र आता पुन्हा वातावरणात झालेल्या बदलासह थंड वाऱ्याचा वेग वाढल्याने राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान चांगलेच खाली घसरले आहे. परिणामी, हवेतला गारठा वाढला असून, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट कायम आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागांत व विदर्भाच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. तर मराठवाड्याच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
मुंबई शहरातदेखील किमान तापमानाने चांगलेच ठाण मांडले आहे. सलग चार दिवसांपासून शहराचे किमान तापमान १४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येत आहे. परिणामी, रात्री हवेतला गारवा वाढल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे. तर दुसरीकडे कमाल तापमान ३० आणि ३२ अंशाच्या टप्प्यात वर-खाली होत असून, कमाल तापमानातील या तफावतीमुळेदेखील मुंबईकरांना बदलत्या वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)