स्वाइन फ्लू रुग्णांच्या शोधासाठी घरोघरी शोधमोहीम
By admin | Published: March 5, 2015 01:59 AM2015-03-05T01:59:38+5:302015-03-05T01:59:38+5:30
जबाबदारी निश्चित ; शहर, ग्रामीण भागात होणार तपासणी.
सचिन राऊत / अकोला: स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रभावाने राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा हादरली असून आजाराचे संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने सोमवारी राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकार्यांना शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले. राज्यातील ८ ते ९ जिल्हय़ात स्वाइन फ्लू चा उद्रेक झाला असून, नागपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ पुणे, पुणे ग्रामीण, नाशिक, सोलापूर, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, लातूर,अकोला आणि बुलडाणा जिल्हय़ात रुग्ण आढळले आहेत. २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान झालेला अवकाळी पाऊस व गारपीट ह्यस्वाइन फ्लूह्णच्या उद्रेकाला दुर्दैवाने आणखी पोषक ठरला. आजाराचा वाढता धोका लक्षात घेता प्रत्येक शहर व ग्रामीण भागात घरोघरी शोधमोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळणार्या रुग्णांवर औषधोपचारही करण्यात येतील.