रुग्णालयातील खाटांची घरबसल्या माहिती
By admin | Published: August 25, 2015 02:15 AM2015-08-25T02:15:32+5:302015-08-25T02:15:32+5:30
धर्मादाय इस्पितळांमध्ये गरीब रुग्णांसाठी किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती आता तुम्हाला घरबसल्या मिळू शकेल. धर्मादाय आयुक्तालयाने त्यासाठी सुरू केलेल्या वेबपोर्टलचे
मुंबई : धर्मादाय इस्पितळांमध्ये गरीब रुग्णांसाठी किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती आता तुम्हाला घरबसल्या मिळू शकेल. धर्मादाय आयुक्तालयाने त्यासाठी सुरू केलेल्या वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले.
सामान्य जनतेला दुर्धर आजारांच्या उपचारासाठी तातडीने आर्थिक साहाय्य उपलब्ध व्हावे यादृष्टीने मुख्यमंत्री साहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली. यात खासगी संस्थांनी सहभागी व्हावे यासाठी आज यशवंतराव प्रतिष्ठानच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. एखाद्या इस्पितळातील खाटांची सद्य:स्थिती काय आहे? रुग्णालयात किती खाटा रिकाम्या आहेत? याची माहिती मोबाइल एसएमएसद्वारेही त्यामुळे प्राप्त होणार आहे.
राज्यात खासगी क्षेत्राचा सहभाग घेऊन प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या वेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, राज्यमंत्री राम शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांची भाषणे झाली. बैठकीस धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे, अभिनेते विवेक ओबेरॉय आणि राज्यभरातील खासगी व विश्वस्त इस्पितळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
मदतीचा हात
सीएसआर फंडांतून कंपन्यांनी जास्तीतजास्त मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीत द्यावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्वतंत्र बैठक घेतली. महाराष्ट्र चेम्बर आॅफ हाउसिंग इंडस्ट्रीने (एमसीएचआय) या वेळी मुख्यमंत्र्यांकडे
२५ लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. एमएमआर क्षेत्रात कर्करोग बाह्यरुग्ण विभागासाठी जागा देण्यात येईल, असे एमसीएचआयने सांगितले. अभिषेक लोढा आणि जिंदाल ग्रुप यांनी प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली.
कर्करोग, हृदयरोग, अपघातातील गंभीर जखमी, ब्रेन हॅमरेज यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून आतापर्यंत ५० हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जायची. आता ही रक्कम २ लाख रुपये करण्यात आली आहे. या रकमेच्या वाटपाचे अधिकार स्वत:कडे न ठेवता मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाच्या समितीला दिले आहेत. कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी आजच्या कार्यक्रमात ही माहिती दिली.
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाने पाठविलेल्या २० शस्त्रक्रिया दररोज मोफत करण्यात येतील, अशी घोषणा नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या विश्वस्तांनी या कार्यक्रमात केली. तर पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलने रुग्णांची एमआरआय चाचणी मोफत केली जाईल, असे जाहीर केले.