रुग्णालयात असुविधा
By admin | Published: July 19, 2016 01:10 AM2016-07-19T01:10:23+5:302016-07-19T01:10:23+5:30
येथील ग्रामीण रुग्णालय हे निमगाव परिसरातील सोयी-सुविधांयुक्त आहे, असे समजले जाते;
निमगाव केतकी : येथील ग्रामीण रुग्णालय हे निमगाव परिसरातील सोयी-सुविधांयुक्त आहे, असे समजले जाते; परंतु याच ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून कावीळ ‘टेस्ट’ होतच नाही. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
निमगाव आणि परिसरातील अनेक लोक या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात, परंतु या ठिकाणी दोन महिन्यांपासून कावीळ टेस्ट होत नाही. ही कावीळ ‘टेस्ट’ गरोदर महिलांना करणे गरजेचे असते. त्याचबरोबर या ग्रामीण रुग्णालयात परिसरातील गरोदर महिला मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. परंतु, रुग्णालयात कावीळ टेस्ट होत नसल्याने महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
समोर कोणताही पर्याय नसल्यामुळे खासगी दवाखान्यात जाऊन कावीळ टेस्ट करून घ्यावी लागत आहे. त्यासाठी होणारा खर्च हा अल्प स्वरूपाचा असला तरी महिलांना परवडणारा नाही. कारण या बहुतांश महिला या रोजंदारीने काम करणाऱ्या आहेत. गरोदर महिलांव्यतिरिक्त अनेक रुग्णसुद्धा या कावीळ टेस्टसाठी येत असतात. परंतु कावीळ टेस्ट होतच नसल्याने या रुग्णांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)
रुग्णालयात जाऊन यासंदर्भात चौकशी केली असता कावीळ टेस्ट करण्यासाठी आवश्यक असणारे किट उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले, परंतु हे किट अजून रुग्णालयाला मिळाले नाही, असेदेखील सांगण्यात आले. खासगी दवाखान्यासाठी होणारा खर्च परवडत नसल्याने या परिसरातील बहुतांशी लोक या ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत; गैरसोयीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.