रुग्णालयांची झाडाझडती

By admin | Published: May 22, 2017 04:05 AM2017-05-22T04:05:45+5:302017-05-22T04:05:45+5:30

अँजिओप्लास्टीसाठी जुन्या आणि वापरलेल्या वैद्यकीय उपकरणांचा वापर रुग्णालयांकडून केला जात असल्याचे अलीकडेच समोर आले होते

Hospital Flora | रुग्णालयांची झाडाझडती

रुग्णालयांची झाडाझडती

Next

मुंबई : अँजिओप्लास्टीसाठी जुन्या आणि वापरलेल्या वैद्यकीय उपकरणांचा वापर रुग्णालयांकडून केला जात असल्याचे अलीकडेच समोर आले होते. या पार्श्वभूमीवर आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) राज्यभरातील रुग्णालयांची झाडाझडती सुरू केली आहे. या तपासणी मोहिमेत वैद्यकीय साहित्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
एफडीएने केलेल्या कारवाईत अँजिओप्लास्टीसाठी जुने आणि वापरलेले बलून कॅथेटर आणि गायडिंग कॅथेटरचा वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. रुग्णालयांकडून कॅथेटरचा पुनर्वापर करतानाच त्याची किंमतही पुरेपूर वसूल केली जात असल्याचीही माहिती समोर आल्यानंतर एफडीएने त्या रुग्णालयांना नोटीसही बजावली होती. तसेच, मागील महिन्यात घाटकोपर येथील रुबी डायग्नॉस्टिक सेंटरवरही एफडीएने छापा टाकला. या वेळी येथे गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि शेड्यूल एच-१मध्ये मोडणाऱ्या एमटीपी किट्सचा अवैध साठा जप्त करण्यात आला.
एफडीएने आता राज्यभरातील रुग्णालयांत यासंबंधी तपासणी मोहीम सुरू केली आहे. यात वैद्यकीय साहित्याचा होणारा वापर-पुनर्वापर, तसेच या साहित्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क या गोष्टी पडताळणार आहेत. मोहिमेच्या अंतिम टप्प्यात याविषयी अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिली. एफडीएच्या तपासणी मोहितमेत नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथील रुग्णालयांत वैद्यकीय साहित्याचा पुनर्वापर करणारी रुग्णालये आढळली आहेत. मात्र अजून तपासणीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती डॉ. कांबळे यांनी दिली.

कॅथेटर वा स्टेंट या वैद्यकीय साहित्यांचा पुनर्वापर करून त्याचे रुग्णांकडून शुल्कही आकारणे हे चुकीचेच आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाची ही मोहीम उपयुक्त ठरेल.
- डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय
ज्या रुग्णांना वैद्यकीय साहित्य परवडत नाही अशा प्रकरणांमध्ये त्यांना स्वस्त उपकरणे देण्याच्या निमित्ताने त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते. या शुल्क आकारणीला आळा घातला पाहिजे, ते या मोहिमेतून साध्य होईल.
- डॉ. नारायण गडकर, हृदयरोगतज्ज्ञ
कॅथेटर वा स्टेंट या वैद्यकीय साहित्यांचा पुनर्वापर करूनही त्यांची पूर्ण किंमत रुग्णांकडून आकारली जायची, हा सर्व प्रकार म्हणजे रुग्णांची फसवणूक आहे.
- डॉ. जयेश लेले, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र)
रुग्णांची लूट
च्फोर्टिस रुग्णालयाने ४५ रुग्णांवर ६६ कॅथेटरचा तर हिरानंदानी रुग्णालयाने २७ रुग्णांवर ४४ कॅथेटरचा पुनर्वापर करत अँजिओप्लास्टी केल्याचे एफडीएच्या चौकशीतून समोर आले होते. तीन रुग्णालयांमध्ये वापरलेले कॅथेटर पुन्हा वापरले जात असून त्याची किंमत मात्र पूर्णपणे वसूल केली जात होती.
च्अंदाजे ९ हजार रुपये अशी कॅथेटरची मूळ किंमत असताना यासाठी २५ हजारांपर्यंत रक्कम उकळली जात होती. तसेच, कॅथेटरच्या खरेदी-विक्रीची योग्य माहितीही उपलब्ध नसल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले.

Web Title: Hospital Flora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.