रुग्णालयांची माहिती देणारे अॅप
By admin | Published: March 15, 2017 02:47 AM2017-03-15T02:47:25+5:302017-03-15T02:47:25+5:30
रुग्णाला रुग्णालयात नेण्यापूर्वी त्या रुग्णालयात अद्ययावत सुविधा आहेत की नाही, हे लवकरच मोबाइलच्या एका क्लिकवर समजणार आहे.
मुंबई : रुग्णाला रुग्णालयात नेण्यापूर्वी त्या रुग्णालयात अद्ययावत सुविधा आहेत की नाही, हे लवकरच मोबाइलच्या एका क्लिकवर समजणार आहे. मानखुर्दच्या दामोदर अपंग स्वाभिमान संस्था आणि एका खासगी कंपनीतर्फे रुग्णालयाची माहिती देणारे अॅप बनवण्यात आले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत डाऊनलोड करता येणार आहे. येत्या गुढीपाडव्याला हे अॅप मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
अनेकदा अपघात अथवा एखाद्याची प्रकृती बिघडल्यास त्याला कुठल्या रुग्णालयात न्यावे, असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाइकांना पडतो. यावर तोडगा म्हणून मानखुर्दच्या दामोदर अपंग स्वाभिमान संस्था आणि एका खासगी कंपनीतर्फे हे अॅप तयार करण्यात आले आहे.
या अॅपवर क्लिक केल्यास तुमच्या जवळपास असलेल्या रुग्णवाहिका, सरकारी व खाजगी रुग्णालयांचे अंतर त्याचप्रमाणे रुग्णालयात सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या बेडची संख्या, रुग्णालयात आकारली जाणारी फी समजणार आहे. रुग्णालयाच्या नावावर क्लिक केल्यानंतर संबंधित रुग्णालयात मेसेज पोहोचण्याचीही सोय आहे.
यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वैद्यकीय सेवा सज्ज करण्यास मदत होणार आहे. राज्य शासनाच्या १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून सर्व सुविधा आणि डॉक्टरसह उपलब्ध असलेली रुग्णवाहिका बोलावणेदेखील या अॅपद्वारे शक्य होणार आहे. (प्रतिनिधी)