घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मारहाण
By Admin | Published: March 20, 2017 09:51 AM2017-03-20T09:51:08+5:302017-03-20T09:51:08+5:30
धुळे येथील डॉक्टर मारहाण प्रकरण ताजं असतानाच घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनाही मारहाण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 20 - धुळे येथील डॉक्टर मारहाण प्रकरण ताजं असतानाच घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनाही मारहाण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. डॉ. उमेश काकडे आणि डॉ. विवेक बडगे असे मारहाण करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावं आहेत . प्लास्टर बदलण्याच्या कारणावरुन रूग्णासोबत असलेल्या चौघांनी या दोन डॉक्टरांना धक्काबुकी केली. यावेळी प्लास्टर कट करण्याच्या कटरने त्यांना मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच सर्व निवासी डॉक्टर अपघात विभागासमोर दाखल झाले. झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी यावेळी बंदची हाक देण्यात आले. 'डॉक्टरांवरील हल्ले थांबलेच पाहिजेत', अशा जोरदार घोषणा देत काम बंद आंदोलन करण्यात आले.
या घटनेमुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉक्टरांना होणा-या मारहाणीविरोधात राज्यभर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री मुंबईतील सायन रुग्णालयातही सुरक्षारक्षकांसमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टर रोहित कुमार यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. मात्र या आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती सायन पोलिसांनी दिली. या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील शासकीय आणि महापालिका रुग्णालयांतील ४ हजार ५०० निवासी डॉक्टरांनी रविवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून मासबंक केला आहे. तर रविवारी सायंकाळी सायन रुग्णालयातही निवासी डॉक्टरांनी कँडल मार्च काढून या प्रकरणी निषेध नोंदविला. या घटनेनंतर पुन्हा एकदा राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.