पालिकेचे रुग्णालयच समस्यांनी आजारी

By Admin | Published: August 26, 2016 01:38 AM2016-08-26T01:38:06+5:302016-08-26T01:38:06+5:30

स्वच्छतागृहांची कमतरता, गळके छत अशा विविध समस्यांच्या गर्तेत सापडल्याने तेथे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे.

The hospital is sick with problems | पालिकेचे रुग्णालयच समस्यांनी आजारी

पालिकेचे रुग्णालयच समस्यांनी आजारी

googlenewsNext


निगडी : प्राधिकरण येथील सिंधुनगरमधील महापालिकेच्या रुग्णालय अपुरी जागा, स्वच्छतागृहांची कमतरता, गळके छत अशा विविध समस्यांच्या गर्तेत सापडल्याने तेथे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे.
शहरातील आरोग्य सुविधा चांगल्या असतील तर नागरिकांचे आरोग्य चांगले राहते, असे म्हटले जाते. आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारी पातळीवर वेगवेगळे प्रयत्न केले जातात. मात्र निगडी प्राधिकरण येथील सिंधुनगर येथील महापालिकेचा दवाखान्यात विविध समस्या दिसून येत आहेत.
राहणीमानाच्या दृष्टीने शहरातील उच्चभ्रू मानले जाणारे निगडी प्राधिकरण परिसरातील या दवाखान्याचे कामगाज पत्र्याच्या खोल्यांमध्ये चालते. या दवाखान्याला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने एकाच खोलीमध्ये जन्म मृत्यु दाखला विभाग व औषधे वितरण विभाग अशा दोन विभागाचे काम चालते. यामुळे येथील कर्मचाऱ्यांना अपुऱ्या जागेत कामकाज करावे लागते. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णासांठी बसण्यासाठी असणाऱ्या खुर्च्यांची संख्या कमी आहे. तर काही खुर्च्यांची दुरवस्था झाल्याने सहा महिन्या पासुन या खुर्च्या एका कोपऱ्यात दुळखात पडल्या आहेत. सकाळी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तपासणीसाठी एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना कित्येक तास रांगेत उभे राहावे लागते. दवाखान्यात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांना दवाखान्या बाहेर नंबर येईपर्यंत उभे रहावे लागते. दवाखान्यात स्वतंत्र अशी लॅब नाही. दवाखान्यात स्वच्छतागृह एकच असल्याने या स्वच्छतागृहाचा वापर दवखान्यातील कर्मचाऱ्यांबरोबर येथे तपासणीसाठी येणारे रुग्णही करतात. यामुळे कित्येकवेळा किरकोळ वादावादीचे प्रकार घडतात. दवाखान्याला स्वतंत्र पार्कींगची सुविधा नसल्याने तपासणीसाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. यामुळे या रस्त्याने ये-जा नागरिकांना कसरत करुन मार्ग काढावा लागतो. दवाखान्याचे छत पत्र्याचे असल्याने पावसाचे पाणी थेट दवाखान्यात पडते. यामुळे दवाखान्यात कामकाज करणे कठीण झाले आहे. दवाखान्याच्या प्रवेशभिंतीवर असणाऱ्या नामफलकाची दुरवस्था झाली आहे. दवाखान्याच्या भिंतीना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासुन महापालिकेचा दवाखाना सुरु आहे. या दवाखान्यात निगडी प्राधिकरणमधील बहुतांश रुग्ण उपचार घेतात. येथे थंडी, ताप, खोकला, लसीकरण, गरोदर माता तपासणी यांसह इतर आजारावर उपचार केले जातात. या दवाखान्याची अनेक दिवसापासुन दुरवस्था झाली असुन याकडे महापालिका लक्ष देत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. दवाखान्यात जन्म मृत्युची नोंद आॅनलाईन केली जाते. दाखले मिळण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी दिला जातो पंरुतु या आॅनलाईन सेवेसाठी वापरण्यात येणारी इंटरनेट सुविधा सतत बंद पडत असल्याने नागरिकांना हेच दाखले आठ ते दहा दिवसांनी मिळतात. यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे घालावे लागतात. यामुळे येथे येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. या दवाखान्याच्या दयनीय अवस्थेमुळे येथे येणाऱ्या रुग्णांना व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने सुसज्ज अश्या मोठ्या जागेत हा दवाखाना सुरु करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. या विभागात लोकसंख्येच्या दृष्टीने एकमेव महापालिकेचा दवाखाना असल्याने तशी सुविधा उपलब्ध नाही. दवखाना छोट्या जागेत असल्याने रुग्णांची गैरसोय होते. प्राधिकरणमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाची संख्या ६० आहे. ज्येष्ठ नागरिकांना दमा, मधुमेह व इतर औषधे व गोळ्या वेळेवर उपलब्ध नसतात. यामुळे जेष्ठ नागरिकांची निराशा होते. (वार्ताहर)
>डॉक्टर व इतर कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या नियमित कामकाज प्रक्रियेसाठी बायोमॅट्रिक हजेरी मशिन बसविण्यात यावी. दवाखान्यात औषधे वेळेवर उपलब्ध व्हावीत. यामुळे नागरिकांच्या हक्काचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल.
- चंद्रकांत उदुगडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती
>जन्म मृत्युचे दाखले मिळण्याच्या खिडकी समोर नागरीक गर्दी करतात परंतु खिडकी शेजारी असलेला विद्युत मीटर व वायरिंग सुस्थितीत नसल्याने शॉर्टसर्कीट सारखे प्रकार घडु शकतात. दवाखान्यातील वॉर्डबॉय व वॉर्ड आया यांना कोणतेही प्रशिक्षण नसताना पेशन्टंला ड्रेसिंग करणे, केसपेपर काढणे, वाफ देणे यांसारखी कामे करावी लागतात, अशी तक्रार नागरिक करीत आहेत.

Web Title: The hospital is sick with problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.