रुग्णालयच अत्यवस्थ!

By admin | Published: June 8, 2017 01:05 AM2017-06-08T01:05:26+5:302017-06-08T01:05:26+5:30

तीर्थक्षेत्र जेजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही धोकादायक इमारतीत असून तिथे रुग्णांसाठी अपुऱ्या सुविधा आहेत.

Hospital is very serious! | रुग्णालयच अत्यवस्थ!

रुग्णालयच अत्यवस्थ!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या व पुणे-पंढरपूर पालखी सोहळ्याच्या मार्गावर असणाऱ्या महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र जेजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही धोकादायक इमारतीत असून तिथे रुग्णांसाठी अपुऱ्या सुविधा आहेत. प्रशासनातील समन्वयाभावी इमारतीचे काम रखडले आहे.
ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळून ११ वर्षांचा काळ लोटला असला तरी अजूनही जुन्या जीर्ण झालेल्या, मोडकळीस आलेल्या आणि पावसाळ्यात गळत असलेल्या धोकादायक इमारतीमध्ये अपुऱ्या सुविधेमध्ये रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत.
अपघातामधील जखमींना व अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आसरा अथवा पुणे येथील ससून रुग्णालयाची वाट धरावी लागते. रुग्णालयात महिन्याला साधारणपणे साडेतीन ते चार हजार रुग्णांवर उपचार केले जातात. ३० बेडचे रुग्णालय मंजूर असताना केवळ इमारत नसल्याने केवळ सात बेडवर रुग्णालय चालवावे लागते.
२०११-१२ मध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला असला तरी गेल्या दीड वर्षापासून हे काम बंद आहे. सुमारे ७० टक्के काम झाले असले तरी बांधकाम व इतर सोई-सुविधा निर्माण करून प्रत्यक्षात नूतन इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित होण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींना कधी मुहूर्त मिळणार? असा सवाल आता विचारण्यात येऊ लागला आहे.
एप्रिल २००६ मध्ये तत्कालीन आमदार अशोक टेकवडे यांच्या प्रयत्नामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा दिला. वास्तविक २०१३-१४ मध्ये काम पूर्ण होऊन नवीन इमारतीमध्ये रुग्णालय स्थलांतरित होणे अपेक्षित होते; मात्र दुर्दैवाने आजतागायत ९० टक्के इमारतीचे काम झाले असून, गेल्या दोन वर्षांपासून तर काम ठप्पच आहे.
रुग्णालयाच्या कामाची उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, पुरंदर, आर. पी. आय.च्या वतीने ग्रामीण रुग्णालयाचे काम त्वरित पूर्ण करून जुन्या इमारतीतील ग्रामीण रुग्णालय नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी रुग्णालयासमोरच जागरण गोंधळ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी करून लवकरात लवकर रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याची आश्वासने दिली आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनीही वस्तुस्थितीची पाहणी करून या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्यात ४ कोटी १८ लाख खर्चून मुख्य इमारतीचे काम करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात ४ कोटी ५५ लाख रुपयांची शवविच्छेदन इमारत, पार्किंग, वीज, पाणीपुरवठा, लिफ्ट जनरेटर, तसेच फर्निचरची कामे करावयाची आहेत, तर तिसऱ्या टप्प्यात ३ कोटी ६९ लाख रुपये खर्चून अधिकारी, कर्मचारी निवासस्थान इमारतींची कामे करावयाची आहेत. या सर्व कामांसाठी शासनाने संपूर्ण निधी वर्ग केलेला आहे. याचाच अर्थ इमारतीच्या संपूर्ण कामाचे पैसे प्राप्त होऊनही काम रखडलेल्या अवस्थेत राहिले आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता आतापर्यंत आपणास १० कोटी २५ लाख रुपयांची बिले मिळाली आहेत. उर्वरित काम आपण दोन महिन्यांत पूर्ण करणार आहोत. मात्र सार्वजनिक बांधकामकडून सहकार्य होत नसल्याचीच तक्रार केली आहे.
कामाची बिले अदा; तरीही काम रखडलेले
दुसरीकडे पालिकेकडून रुग्णालयाला केवळ जागा देणे होते, ती दिलेली आहे. सार्वजनिक विभागाकडूनही केलेल्या कामाची बिले अदा करण्यात आलेली आहेत.
तरीही काम रखडले आहे. समन्वय नसल्यानेच काम रखडलेले निदर्शनास येत आहे.

Web Title: Hospital is very serious!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.