पदवीधर डॉक्टरांशिवाय रुग्णालये
By admin | Published: February 9, 2015 05:46 AM2015-02-09T05:46:05+5:302015-02-09T05:46:05+5:30
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागांत बरीच रुग्णालये मान्यताप्राप्त पदवीधर डॉक्टरांशिवाय चालत असल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला
पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागांत बरीच रुग्णालये मान्यताप्राप्त पदवीधर डॉक्टरांशिवाय चालत असल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत आरोग्य सेवा मुंबई व शासनाच्या आरोग्य विभागाकडून शहर व ग्रामीण रुग्णालयांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
भिवंडी शहर व ग्रामीण भागांत मोठ्या संख्येने कामगारवर्गाचे वास्तव्य आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या उदासीनतेचे दुष्परिणाम रहिवाशांना सोसावे लागतात. एक खासदार, दोन आमदार व ९० नगरसेवक असताना महापालिकेचे स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय शासनाकडे सोपवून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात सर्व राजकीय पुढाऱ्यांनी धन्यता मानली आहे. मात्र, मनपास ग्रामीण आरोग्य सेवेप्रमाणे नागरी आरोग्य केंद्र शहरात सुरू करता आले नाही. या स्थितीचा गैरफायदा घेत शहरात मोठमोठी रुग्णालये उभी राहिली आहेत. मात्र, बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये एमबीबीएस, एमडी, सर्जन असे डॉक्टर नसून होमिओपथी, आयुर्वेदिक व इलेक्ट्रोपथी डॉक्टर बिनधास्तपणे अॅलिओपथीचे उपचार करत आहेत. उपचार करताना रुग्णाची प्रकृती हाताबाहेर गेली की, असे डॉक्टर रुग्णास मुंबईस नेण्याचा सल्ला देतात. योग्य वेळी आवश्यक उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावतो,अशा घटना बऱ्याचवेळा घडतात. मात्र, बहुसंख्य कामगार व रहिवासी परप्रांतीय असल्याने अशा घटनांना वाचा फुटत नाही. काही वेळा रुग्णाच्या नातेवाइकांवर दबाव आणून अशी प्रकरणे परस्पर निकाली काढली जातात.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपासून शहरातील रुग्णालये, खाजगी दवाखाने व रक्त, लघवी तपासणी प्रयोगशाळेची नोंदणी पूर्ण झालेली नाही. आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षामुळे रहिवाशांच्या जीवास धोका आहे. महापालिकेकडून सध्या बीजीपी दवाखाना या एकमेव ठिकाणी उपचार केले जातात. पालिकेच्या इतर १४ केंद्रांत बा'रुग्ण विभाग सुरू नसल्याने खासगी दवाखान्यांत जावे लागते.