मराठा विद्यार्थ्यांसाठी आता वसतिगृह निर्वाह भत्ता, शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:49 IST2025-02-26T18:48:26+5:302025-02-26T18:49:03+5:30
तंत्रशिक्षण संचालनालयाचे पत्र

मराठा विद्यार्थ्यांसाठी आता वसतिगृह निर्वाह भत्ता, शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करता येणार
सांगली : मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या मागणीची दखल घेत तंत्रशिक्षण संचालनालयाने आता शिष्यवृत्ती व वसतिगृह निर्वाह भत्ता योजनांकरिता एसईबीसी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे मराठा व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या डीबीटी पोर्टलवर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना’ व ‘डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना’ राबविण्यात येतात. एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही या योजना लागू करण्याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्यानंतर शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला. त्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिल्यानंतर सोमवारी संचालनालयाने याबाबतची सूचना प्रसिद्ध करीत मराठा व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना अर्जाचे आवाहन केले.
सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सर्व संस्थांनी सदर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्याबाबत माहिती देऊन पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घ्यावेत, अशी सूचनाही दिली आहे.
पंधरा दिवसांनी आढावा
योजनेच्या लाभासाठी अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागीय कार्यालयांनी विशेष मोहीम राबवून त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व संस्थांसोबत बैठक घेऊन योजनांच्या प्रगतीचा आढावा दर पंधरा दिवसांनी घ्यावा, अशा सूचनाही दिल्या आहेत.
तातडीने अर्ज निकाली निघणार
ज्या विद्यार्थ्यांनी नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र अपलोड केले असेल, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित न ठेवता संबंधित योजनेच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार काटेकोरपणे तपासणी करून निकाली काढावेत, असे आदेशात म्हटले आहेत.
या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार
पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र अपलोड केले नसेल, तर अशा विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र अपलोड करून मुदतीत अर्ज भरावा लागेल.