राज्यात जूनपासून मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे
By admin | Published: May 1, 2017 04:19 AM2017-05-01T04:19:04+5:302017-05-01T04:19:04+5:30
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जूनपासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करणार असून, त्याची घोषणा
कोल्हापूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जूनपासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करणार असून, त्याची घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आमसभेत जाहीर केले.
मराठा स्वराज्य भवनसाठी सरकारी जागा आवश्यक असून त्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक सभागृहात मराठा आमसभा झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक वसंतराव मोरे हे होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आमसभेच्या निमित्ताने वेगळ्या कल्पना पुढे येत आहेत. गेल्याच आठवड्यात गोलमेज परिषद झाली. त्यांनीही नेतृत्व ठरवून राज्य शासनाशी चर्चेची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही चर्चेसाठी तयार आहेत; पण मराठा आरक्षणाबाबत चर्चेला येताना राज्य शासनाने आतापर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचा अभ्यास करून पुढे यावे. या योजनांतील त्रुटीही दाखवून द्याव्यात. वसतिगृहासाठी ज्यांच्याकडे इमारती नाहीत, अशांनी भाडेतत्त्वावर इमारती घेऊन ती वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. २५० मुलांची, तर २५० मुलींची संख्या असणारी वसतिगृहे असतील, अशी कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मराठा समाजासाठी गुणवत्ता आणि घटनात्मकरीत्या टिकेल असेच्ां आरक्षण हवे आहे. त्यासाठी मराठा समाजातील अभ्यासू व विचारवंतांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे
यांनी केले.
खासदार, आमदारांची उपस्थिती
महापौर हसिना फरास, खा. धनंजय महाडिक, खा. संभाजीराजे छत्रपती यांच्यासह आ. सतेज पाटील, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील आदी उपस्थित होते.