थंडीची गरम पार्टी !
By admin | Published: January 24, 2016 12:16 AM2016-01-24T00:16:56+5:302016-01-24T00:16:56+5:30
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात थंडीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पोपटी पार्ट्या रंगतात. या काळात भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे पोपटी पार्ट्यांबरोबरच तंदूर, बार्बेक्यू,
(ओट्यावरुन)
- भक्ती सोमण
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात थंडीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पोपटी पार्ट्या रंगतात. या काळात भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे पोपटी पार्ट्यांबरोबरच तंदूर, बार्बेक्यू, कबाब खाण्याची मजा काही औरच असते.
सध्या मस्त थंडी पडली आहे. या दिवसात गरमागरम चटकदार काहीतरी खायला मिळावे, असे वाटत राहते. भाज्या आणि पालेभाज्यांच्या बाबतीत तर हा काळ म्हणजे पर्वणीच. गाजर, मटार, कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरचीपासून ते फरसबी, वाल पोपटी अशा प्रकारच्या शेंगा, तसेच पालक, मेथी यासारख्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात आणि त्याही ताज्या मिळतात. त्यामुळे या सर्व भाज्यांपासून वेगळे पदार्थ करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. म्हणूनच तर या काळात करण्यासारखे बरेच पदार्थ आहेत. फ्लॉवर, मटार, गाजर एकत्र करून लोणचे केले जाते. आवर्जून केला जातो तो 'उंधियो', पण खरी मजा रंगते ती पोपटी किंवा हुरडा पार्टीत.
गावातल्या शेतात किंवा गच्चीवर वर्षातून एकदा तरी अशी पोपटी पार्टी केली जाते. रायगड जिल्ह्यात मिळणारा भांबुर्डीचा पाला आणि मीठ मडक्यात भरले जाते. त्यानंतर त्यावर वांगे, बटाटा, वालाच्या शेंगा, फ्लॉवर अशा भाज्यांना मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, नारळ, ओवा, गावठी मसाला आणि दही लावून ते सर्व या मडक्यात भरले जाते. वर पुन्हा पाला टाकून मडक्याचे तोंड बंद करतात. त्यानंतर मडक्याभोवती पाला, सुकी लाकडे टाकून आग पेटवली जाते. त्या धगीत साधारण अर्धा तास तरी हे आतले पदार्थ छान शिजतात. अशा या पोपटी वा हुरडा पार्टीचा बेत रंगवताना सोबत भरपूर मित्र-मैत्रिणी हवेत,
पण अशी पार्टी दर वेळी करणे शक्य नसते. त्यासाठी मग वेगळा पर्याय म्हणून आजकाल तंदूर, कबाब, बार्बेक्यू पार्टी करण्याकडे कल वाढला आहे. खरं तर हे पदार्थ मुख्य जेवण सुरू करण्याआधी स्टार्टर्स म्हणून खाण्यासारखे, पण ते करताना येणारी मजा त्याची चव आणखी रंगतदार करतात.
तंदूर आणि कबाब हे मुळचे मिडल इस्ट प्रांतातलेच. कबाब नजाकतीने खिलवले ते नवाबांनी, पण आता ते मोठमोठ्या हॉटेलांपासून ते अगदी रस्यावरच्या ठेल्यांपर्यंत स्टार्टर्स म्हणून खाल्ले जातात. तंदूर स्टिक विकत घेऊन घरीही ते करता येतात. मात्र, कुठेही खाल्ले तरी त्याचे तंत्र मात्र नेमके जमायला हवे. त्याचबरोबरीने आता बार्बेक्यू पार्ट्यांची क्रेझही वाढत चालली आहे. तंदूर हे भट्टीत कोळशावर ग्रिल केले जातात. मांसाहारी तंदूर जास्त लोकप्रिय असले, तरी शाकाहारींसाठी अनेक प्रकार आहेत.
व्हाइट, रेड आणि ग्रीन कलरची पेस्ट यात प्रामुख्याने वापरली जाते. व्हाइट पेस्टसाठी काजू पेस्ट अत्यंत महत्त्वाची असते. ही पेस्ट लाल रंगाच्या कबाबसाठीही वापरली जाते. त्यात लाल रंगासाठी लाल मिरची टाकली जाते, तर पुदिना, कोथिंबीर, मिरची एकत्र करून हिरवी पेस्ट बनते. त्या व्यतिरिक्त लवंग, दालचिनी, काळीमिरी, तमालपत्र, जायफळ, ओवा, बडीशेप याचे मिश्रण भाजून वाटून हा मसाला दह्यात मिक्स करताना, ज्या रंगाचे कबाब हवे आहेत, ती पेस्ट यात घातली जाते. व्हेज तंदूर करताना शिमला मिरची, कांदा, पनीर असे प्रकार या पेस्टमध्ये मेरिनेट करून काही काळ फ्रिजमध्ये ठेवतात. त्यानंतर करायच्या वेळी मोठ्या तंदूर स्टिकवर मेरिनेट केलेल्या भाज्या खोचून त्या तंदूर पॉटमध्ये ग्रील करतात. खरपूस रंगातले हे गरमागरम तंदूर हिरव्या चटणीबरोबर खाताना थंडीत जी मजा येते ती औरच. या तंदूरमध्ये तंदुरी आलू, मशरूम पनीर तंदूर, हिरव्या रंगात फ्लॉवर मॅरिनेट करून केलेला व्हेज लॉलीपॉप तंदूर, पनीर टिक्का असे प्रकार लोकप्रिय आहेत. खास तंदूरसाठी सिगडी, बडे मियाँसारखी अनेक हॉटेल्स लोकप्रिय आहेत.
तंदूरप्रमाणेच कबाबचे आकर्षणही अनेकांना आहे. कबाब करताना मटार, गाजर, फ्लॉवर, कोबी, कॉर्न अशा भाज्या मॅश करून त्यात बटाटा, तिखट, चाट मसाला घालून ते मिश्रण तव्यावरती कमी तेलात भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूंनी चांगला रंग आल्यावर त्यावर चाट मसाला पेरायचा. मुले भाज्या खात नाहीत, अशी तक्रार करणाऱ्या आयाही आजकाल कबाबमध्ये अगदी भोपळा, वेगवेगळ््या प्रकारच्या डाळी, पालेभाज्या यांचे मिश्रण एकत्र करून कबाब बनवतात. बरं हे कबाब बनवताना चीज टाकलं की, ते आणखी टेस्टी लागणारच ना! पालक, मटार, आलं, लसूण घालून केलेला हराभरा कबाब तर आॅलटाइम हिटचं. असे अनेक पटकन खाता येणारे कबाब, तंदूर पदार्थ खवय्यांना आपलेसे वाटतात.
थोडक्यात काय, तर थंडीच्या दिवसांत मिळणाऱ्या स्वस्त आणि फ्रेश भाज्यांपासून करता येणारे अनेक प्रकार आहेत. फक्त ते बनवण्याची आणि खाऊ घालण्याची इच्छा मात्र हवी, नाही का!
पाश्चिमात्य देशातून आयात झालेला प्रकार म्हणजे बार्बेक्यू. यात सर्वांनी एकत्र येऊन पदार्थ बनवण्याची मजा घेता येते. आता अनेक हॉटल्समध्ये लाइव्ह बार्बेक्यूची मजा घेता येते. बार्बेक्यू बनवताना तंदूरचे मसाले वापरले जातात. त्याशिवाय आता बार्बेक्यू सॉसही मिळतो.
पनीर, रंगीत शिमला मिरची, कांदा हे आवडीच्या मसाल्यात मॅरिनेट करायचं आणि ते सळईवर खोचायचं. ती सळई जाळीवर ठेवून कोळशाच्या धगीवर हे तंदूर ग्रील करायचे. छान भाजले गेले की, बार्बेक्यू सॉस, चिली सॉसबरोबर ते खाता येतात. यात आवडीनुसार फक्त मशरूम, पनीर घेऊनही बार्बेक्यू बनवता येतात. बार्बेक्यूला कोळशाची धग चांगलीच हवी असते. घरी गॅसवर करताना मात्र जाळीवर सळईच्या बाजूला एखाद-दोन कोळसे ठेवून स्मोक फ्लेवर देता येऊ शकतो.