गरम चाय की प्याली हो!

By Admin | Published: February 5, 2017 01:13 AM2017-02-05T01:13:17+5:302017-02-05T01:13:17+5:30

सकाळी उठल्या उठल्या आपल्याला दूध, चहा, कॉफी पिण्याची सवय असते. अनेक जण तर चहाच पितात. लोकांच्या चहाची आवड आणि आरोग्याचा विचार करून आता

Hot tea cup! | गरम चाय की प्याली हो!

गरम चाय की प्याली हो!

googlenewsNext

- भक्ती सोमण

सकाळी उठल्या उठल्या आपल्याला दूध, चहा, कॉफी पिण्याची सवय असते. अनेक जण तर चहाच पितात. लोकांच्या चहाची आवड आणि आरोग्याचा विचार करून आता वेगवेगळ्या चवीचे चहा मिळायला लागले आहेत.

सकाळ कशी ताजीतवानी हवी. ब्रश करून झाल्यावर चहाचं आधण ठेवायचं. मग त्यात भरपूर किसलेलं आलं, साखर घालून उकळल्यावर चहा पावडर घालायची. छान उकळी आली की गॅस बंद करून थोड्या वेळाने तो चहा गाळायचा आणि कोऱ्या चहात आधीच तापलेलं दूध घालायचं. साखरेचा गोडवा, आल्याचा तिखटपणा आणि चहाची स्वत:ची चव याच्या मिश्रणाने तयार झालेला हा फक्कड चहा पिताना मजा येते. हा चहा पिऊन आपला दिनक्रम सुरू होतो. त्यानंतर मग दिवसभरात अनेकदा आपण वेगवेगळ्या ठिकाणी चहा पितो. प्रत्येक चहाचा रंग-ढंग वेगळाच असतो. टपरीवरच्या एक प्याली चायची मजा तर वेगळीच असते. तो चहा कसा करतात ते बघितलं की तो प्यावासाच वाटणार नाही. पण काचेच्या ग्लासातला त्या चहाचा घोट प्यायलावरच त्याची खरी मजा कळते. म्हणून तर सुटबुटवाल्यांनाही या चहाची भुरळ पडतेच पडते. असे हे चहापुराण कधीच न संपणारे आहे.
असं म्हणतात की, २,७३७ वर्षांपूर्वी चीनचा सम्राट शैन नुंग यांनी उकळते पाणी गार करत ठेवले होते. तेव्हा काही पानं येऊन पडली. त्या पानांमुळे पाण्याला विशिष्ट असा रंग आला. अतिशय वेगळी असलेली ती चव सम्राटाला आवडली. तेव्हापासूनच चहाचा प्रसार सुरू झाला. सन ३५०ला चहा पिण्याचा पहिला उल्लेख तज्ज्ञांना सापडला. १६१०नंतर हळूहळू पाश्चात्त्य देशात चहाचा प्रसार व्हायला लागला. परदेशात तर चहा चांगलाच रूळला आहे. मात्र, भारताचा विचार करायचा झाल्यास, आसामच्या खास पत्तीयोसे बनलेल्या या चहाचा भारतात शोध लागला तो सन १८१५ला. आसाममधले स्थानिक कबाईली लोक चहाची पाने उकळून पितात हे इग्रजांच्या लक्षात आले. मध्ये बराच काळ गेला. त्यानंतर भारताचे गर्व्हनर जनरल लॉर्ड बॅटिक यांनी १८३४ साली भारतात चहाचे उत्पादन कसे करता येईल याबाबत एक समिती स्थापन केली. १८३५ साली आसाममध्ये चहाचे मळे सुरू झाले. त्यानंतर ब्रिटिशांनीच भारतीयांना चहा पिण्याची सवय लावली. अशा प्रकारे एवढ्या वर्षांच्या टप्प्यांत चहाने वेगवेगळ्या चवीत, ढंगात अनेकांना तृप्त केले.
कित्येक लोक तर खूप आवडीने कमी दूध घालून चहा पिणे पसंत करतात. तर काही जण कोरा चहा पितात. कोऱ्या चहात पोषणतत्त्व अधिक प्रमाणात असतात. दूध घातल्याने ती तत्त्व कमी होतात. त्यामुळे कोरा चहा आवर्जून प्यावाच, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. याशिवाय सध्या ग्रीन टी प्रचंड लोकप्रिय असून, तो रोज पिणारेही कितीतरी लोक आहेत.
जसजसा काळ बदलला तसतशा करण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या आहेत. यात कमी जागेत विविध प्रकारचे चहा देत गल्लीवरच्या चहाच्या टपऱ्यांनी मोठ्या हॉटेल्सच्या तुलनेत आपलं अस्तित्व जपलं आहे यात शंकाच नाही. मुंबई उपनगरात तर लाखभर तरी अशा टपऱ्या असतीलच. लोकांना आवडत असलेला बदल जाणून घेत चहाचे वेगवेगळे फ्लेवर्स देणारी अनेक हॉटेल्स सुरू झाली आहेत. तेथे मसाला चायपासून हनी लेमन टी, आइस टी, हर्बल टी, ब्लॅक टी, पीच, मिंट, चॉकलेट असे गरम व गार असंख्य प्रकार आता मिळायला लागले आहेत. एकंदर काय तर, सकाळपासून संपूर्ण दिवस ताजा आणि समरसून जगायचा असेल तर चहावाचून पर्याय नाहीच! बरोबर ना!

पद्घत बदलतेय
चहा पिण्याच्या पद्धतीतही आता खूप बदल झाले आहेत. अगदी आत्ताआत्तापर्यंत आपण चहा पिताना बशीचा वापर करायचो. बशीतनं सुर्रर्र करीत चहा पिण्याची गंमत काही औरच असायची. पण लोकांच्या सवयी बदलल्याने बशी मिळणे आता दुरपास्तच झाले आहे. त्याऐवजी चहा पिण्यासाठी मग्ज, छोटे कप मिळतात. मातीच्या कपात, काचेच्या ग्लासात (टपरीवर मिळणारे ग्लास) चहा पिण्याचं प्रमाण वाढतं आहे. चवीबरोबरच चहा देण्याच्या पद्घती कशा वेगळ्या आहेत याकडेही आता लोकांचे चांगले लक्ष असते. या बदलाकडे आता चहा वळत आहे.

Web Title: Hot tea cup!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.