राज्यात होरपळ सुरुच; उष्माघाताचे तीन बळी, चंद्रपूर ४६ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 05:26 AM2018-05-09T05:26:20+5:302018-05-09T05:26:20+5:30
प्रखर उन्हामुळे विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशाची होरपळ सुरूच असून उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी उघडकीस आले. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
पुणे - प्रखर उन्हामुळे विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशाची होरपळ सुरूच असून उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी उघडकीस आले. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ मध्य महाराष्ट्रात गुरुवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
अमरावती जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला. राजेश विश्वास अंबाडकर (४८, रा. जुनीवस्ती, बडनेरा) हे शेतात काम करीत असताना चक्कर येऊन कोसळले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. धामणगाव रेल्वे येथे अंजनसिंगी मार्गावरील एका ढाब्याजवळ ३५ वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळून आला. तो भिकारी असून त्याचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याचे सांगणयात येत आहे. हा उष्माघाताचा बळी असल्याचे पोलीस अहवालात नमूद आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव (ता. जरंडी) येथील सुनील पंडित लोहार (३९) यांचा सोमवारी उष्माघाताने मृत्यू झाला. लोहार यांनी रविवारी दिवसभर भात्याजवळ काम केले. भात्याची उष्णता आणि उन्हाची दाहकता यामुळे चक्कर आल्याने त्यांना रात्री खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांचे निधन झाले.
राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे ३७़४, लोहगाव ३९़३, अहमदनगर ४३, जळगाव ४२़८, कोल्हापूर ३७़५, महाबळेश्वर ३२़७, मालेगाव ४२़२, नाशिक ३८़१, सांगली ३९, सातारा ३९़७, सोलापूर ४२़१, मुंबई ३३़५, सातांक्रुझ ३३़७,
अलिबाग ३३़१, रत्नागिरी ३४़२, पणजी ३५़२, डहाणू ३४़७, औरंगाबाद ३९़५, नांदेड ४३़५, अकोला ४३, अमरावती ४२़८, बुलढाणा ३९़८, चंद्रपूर ४६, गोंदिया ४२़८, नागपूर ४४़४, वर्धा ४४, यवतमाळ ४३