भाडेवाढीस नकार दिल्याने हॉटेलचालकाची हत्या
By admin | Published: February 23, 2015 05:08 AM2015-02-23T05:08:05+5:302015-02-23T05:08:05+5:30
भाडेवाढ करण्यास नकार दिल्याने हॉटेलमालकानेच हॉटेलचालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी आग्रीपाड्यात समोर आली.
मुंबई : भाडेवाढ करण्यास नकार दिल्याने हॉटेलमालकानेच हॉटेलचालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी आग्रीपाड्यात समोर आली. तौफिक अहमद सिद्दिकी (५०) असे मृत हॉटेलचालकाचे नाव असून, हत्येच्या गुन्ह्यात हॉटेलमालकासह त्याच्या एका साथीदाराला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
आग्रीपाडा येथील काळापाणी परिसरात शेख यांच्या मालकीचे उस्मानिया हॉटेल आहे. गेल्या २५ वर्षांपासून हे हॉटेल मृत
सिद्दिकी भाडेतत्त्वावर चालवत होते. वाढत्या महागाईमुळे जुना करार थांबवत जास्त भाडे देण्याची मागणी शेखने केली. मात्र भाडेवाढ करण्यास विरोध करीत शेखने डिपॉजिट केलेली साडेतीन लाखांची रक्कम परत देण्याची मागणी केली. शेखसह त्यांच्या मुलांनी सिद्दिकीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. काही दिवसांसाठी सिद्दिकी गावी गेला असताना शेखच्या मुलांनी हॉटेलवर कब्जा केला. गावाहून परतलेल्या सिद्दिकीने डिपॉजिट मिळेपर्यंत हॉटेल सोडणार नाही, असे सांगितले. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास हॉटेलचा ताबा घेण्यासाठी शेख त्याच्या दोन साथीदारांसह हॉटेलवर गेला. मात्र, सिद्दिकी डिपॉजिटच्या रकमेमुळे अडून राहत असल्याचे लक्षात येताच शेख आणि त्याच्या साथीदारांनी त्याला बेदम चोप दिला. या मारहाणीत सिद्दिकीचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
या प्रकरणी शेखसह मोहम्मद जाफर आणि परवेज अलीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून शेख आणि अलीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या झटापटीत जाफर जखमी झाला असून, जवळच्या खासगी रुग्णालयात तो उपचार घेत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आग्रीपाडा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)