शिवभोजन देणारे हॉटेलचालकच ‘उपाशी’; योजना सुरू झाल्यापासून प्रशासन देईना बिल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 02:38 AM2020-03-12T02:38:47+5:302020-03-12T06:50:18+5:30
गरजू लोकांसाठी शासनाने २६ जानेवारीपासून राज्यात शिवभोजन योजना लागू केली. दुपारी १२ ते २ या वेळेत १० रूपयांत जेवण मिळणार आहे.
अहमदनगर : गोरगरीब, गरजू लोकांसाठी शासनाने दहा रूपयांत शिवभोजन सुरू केले खरे, मात्र ही योजना सुरू झाल्यापासून शिवभोजन हॉटेलचालकांचे बिलच अदा झालेले नाही. त्यामुळे गरजूंना दहा रूपयांत जेऊ घालणारे हॉटेलचालक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
गरजू लोकांसाठी शासनाने २६ जानेवारीपासून राज्यात शिवभोजन योजना लागू केली. दुपारी १२ ते २ या वेळेत १० रूपयांत जेवण मिळणार आहे. उर्वरित ४० रूपयांची रक्कम हॉटेलचालकांना शासनाकडून मिळणार आहे. नगरमध्ये १० ठिकाणी ही योजना राबवली जात असून प्रतिसाद पाहता शासनाने ताटांची संख्या दुपटीने वाढवून १४०० केली. सर्वच केंद्रांवर उत्तम प्रतिसाद मिळत असून १४०० थाळ्या शिवभोजन लोकांना विनातक्रार मिळत आहे. परंतु या हॉटेलचालकांचे बिलच अद्याप अदा झालेले नाही. पंधरा दिवसांनी हॉटेलचालकांची बिले अदा करावीत, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे निधीही वर्ग झाला आहे.
शिवभोजन योजनेंतर्गत हॉटेलचालकांची बिले अदा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निधी आहे. त्यांची बिलेही तयार करून पाठवली आहेत. मात्र काही कारणास्तव ती बिले कोषागारात अडकली आहेत. त्याचे कारण शोधून त्वरित बिले अदा करण्यात येतील. - जयश्री माळी, उपजिल्हाधिकारी, पुरवठा विभाग