हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

By Admin | Published: May 19, 2016 02:29 AM2016-05-19T02:29:19+5:302016-05-19T02:29:19+5:30

लोकमतच्या पुढाकाराने सुरू असलेल्या जलमित्र अभियानाची दखल शहरातील हॉटेल व्यावसायिक संघटनेने घेतली आहे.

Hotel Professional Initiative | हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

googlenewsNext


पिंपरी : लोकमतच्या पुढाकाराने सुरू असलेल्या जलमित्र अभियानाची दखल शहरातील हॉटेल व्यावसायिक संघटनेने घेतली आहे. संघटनेचे सदस्य असलेल्या हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाणी बचतीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. एवढेच नव्हे, तर त्यातील काही हॉटेल व्यावसायिकांनी प्रत्यक्ष कृतिशील पाऊलसुद्धा उचलले आहे. संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली हॉटेलमध्ये टेबलावर ठेवण्यात येणाऱ्या स्टँडीवर लगेच लक्ष जाईल. अशा ठिकाणी लोकमत जलमित्र अभियानाचे स्टिकर लावले आहेत. यासह अन्य उपाययोजना केल्या आहेत.
लोकमत पिंपरी कार्यालयात हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची परिचर्चा घेतल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून तातडीने या अभियानाला प्रतिसाद दिला. असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी व अन्य पदाधिकाऱ्यांनी जलमित्र अभियान राबविण्याच्या सूचना सर्व सदस्यांना दिल्या. मोबाइलवर एसएमएस पाठवले. सुमित बाबर यांनी संभाजीनगर येथील त्यांच्या हॉटेलात ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लोकमत जलमित्र अभियानाचे स्टिकर्स आणि पोस्टर्स लावून जनजागृतीचा प्रयत्न केला आहे. टेबलावर आवश्यक तेवढेच पाणी ठेवून पाण्याचा अपव्यय टाळला आहे. त्यांच्या पिंपळे सौदागरमधील हॉटेलात तर पक्ष्यांसाठी लाकडी घरटी तयार केली आहेत. पक्ष्यांना पाणी तसेच चारा ठेवला आहे.
पिंपरीतील गणेश हॉटेलमध्ये गणेश कुदळे यांनी हॉटेलात प्रवेश करताच दिसून येईल अशा पद्धतीने जलमित्र अभियानाचे स्टिकर्स लावले आहेत. स्टिकर्स लावल्यामुळे ग्राहक आवश्यक तेवढेच पाणी वापराची दक्षता घेत आहेत. (प्रतिनिधी)
> पाणी टंचाईच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले असल्याने प्रत्येकाने काटकसरीने पाणी वापरण्याचे धोरण अवलंबले पाहिजे. लोकमतचे जलमित्र अभियान हा स्तुत्य उपक्रम असून, अशा विधायक उपक्रमात आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने पाणी बचतीच्या उपाययोजना राबविल्या आहेत. रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर किचन, तसेच भांडी धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी खर्च होते. पाणी काटकसरीने वापरावे, अशा सूचना हॉटेल कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
- सुमित बाबर
>हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले आहे. ग्राहकांकडून गरजेपेक्षा अधिक पाणी वापरले जाऊ नये, यासाठी टेबलावर ठेवण्यात येणारे ग्लास अर्धेच भरले जातात. पाणी मागितल्यास वेटर लगेच पाणी देतात. हॉटेल असोसिएशनचे सदस्य असलेल्या अन्य सहकाऱ्यांनासुद्धा पाणी बचतीची दक्षता घ्यावी, असे सुचविले आहे.
- गणेश कुदळे

Web Title: Hotel Professional Initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.