पोटाची खळगी भरण्यासाठी सोडले घरदार
By admin | Published: April 29, 2016 01:46 AM2016-04-29T01:46:23+5:302016-04-29T01:46:23+5:30
राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाने जनजीवन विस्कळीत झाले असून, पाण्याअभावी शेकडो एकर शेती पडीक पडली आहे
राजेगाव : राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाने जनजीवन विस्कळीत झाले असून, पाण्याअभावी शेकडो एकर शेती पडीक पडली आहे. काही भागात हातची पिके जळून गेल्यामुळे शेतकऱ्यापुढे कुटुंबाच्या रोजीरोटीचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभारला आहे.
तळहाताच्या फोडाप्रमाणे लहानाची मोठी केलेली चारा व पाणी न मिळाल्याने जनावरे मरणासन्न झाली आहेत. काही भागात जनावरे डोळ्यांदेखत मरण्यापेक्षा रामभरोसे वाऱ्यावर सोडून दिलेली आहेत.
शेतीच पडीक पडल्याने मजुरांना शेतात कामधंदा मिळत नाही तसेच गावच्या आसपास रोजगारही उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे लोंढे दोन वेळच्या भाकरीसाठी शहराकडे निघाले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी घरंदारं, नातीगोती सोडून काळजावर दगड ठेवून जड अंतकरणाने त्याने आपले चंबूगबाळ आवरून शहराची वाट धरू लागला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीच नसल्याने स्वत:चे राहते घर, बागायती अथवा जिरायती जमीन सोडून शहराचा आसऱ्यास जाऊन मिळेल ते काम करण्याची वाईट वेळ या दुष्काळग्रस्तांवर आली आहे.
काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. आई-बापाबरोबर मुलेही दुष्काळी भागातील शाळा सोडून शहरात जाऊन छोटे-मोठे काम करत संसाराला आधार देऊ लागली आहेत. मुले जोपर्यंत लहान आहेत आणि हाताखाली येत नाहीत तोपर्यंत दुष्काळाने घाला घालून थकलेल्या वयातही मिळेल ते काम करून पोट भरण्याची वाईट वेळ आली आहे. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती भयानक असल्याने या भागातील नागरिकांनी पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई या शहरांचा रस्ता धरला आहे. अशीच परिस्थिती दौंड तालक्यातील काही गावांची आहे. स्वत:चे हक्काचे घर जमीन सोडून आलो याचे दु:ख वाटते. पण पाणी नसेल तर त्या जमिनीकडे पाहून तरी काय करणार. गावातदेखील दुष्काळामुळे कामधंदे बंद पडल्यामुळे हाताला काम मिळत नाही. मोलमजुरी करून पोट भरावे तर तेही नाही. यामुळे नाईलाजास्तव गाव सोडावे लागले आहे. पण येथे काहीतरी कामधंदा मिळतो. कसेतरी दिवस काढू शकतो.
>एका कुटुंबाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की , दुष्काळामुळे गावाकडे शेतीत पीकपाणी नाही. रोजच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला. मुलाला पुढचे शिक्षण घेता येईना. गावात पाण्याचा थेंब नाही. मैलोन्मैल चालत जाऊन पाणी आणावे लागते. अर्धा दिवस पाणी आणण्यातच जातो. पाणी आहे तर माणूस, नाही तर काही नाही. एक वेळ दिवसातून एकदा जेवण दिले तरी चालेल पण प्यायला पाणी हे पाहिजेच. पाण्याअभावीचे जीवन आम्ही अनुभवले आहे. दुष्काळामुळे पोट भरण्यासाठी नाईलाजाने आम्ही या भागाच्या आश्रयास आलो.
दुष्काळामुळे गावची गावे ओस पडली आहेत. गावातले सगळेच पोटापाण्यासाठी शहराचा रस्ता धरायला लागले आहेत. घरातील पुरुष मंडळी मोलमजुरी तर महिला घरकाम करून रोजची भाकरीची सोय करीत आहेत. शहरात हाताला काम मिळते म्हणून घरादाराच्या पोटापाण्याची सोय होत आहे. गावाला धरून बसलो तर दुष्काळाने पाण्यावाचून तडफडून मरायची वेळ आली असती. त्यामुळे गाव सोेडण्याचा निर्णय घेतला.