घराचे माळवद कोसळून चौघे जखमी
By admin | Published: July 11, 2016 09:55 PM2016-07-11T21:55:20+5:302016-07-11T21:55:20+5:30
पवारवाडी (महदू, ता.सांगोला) येथील एका घराचे माळवद कोसळून त्याखाली घरातील चौघे गाढले गेले
ऑनलाइन लोकमत
सांगोला, दि. 11- पवारवाडी (महदू, ता.सांगोला) येथील एका घराचे माळवद कोसळून त्याखाली घरातील चौघे गाढले गेले मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांनी तातडीने गाढले गेलेल्यांना बाहेर काढले गेले. चौघेही जखमी झाले असले तरी त्यांच्या सुदैवाने जीवावर बेतले नाही.
ही घटना रविवारी रात्रौ ११ च्या सुमारास घडली. हणमंत दत्तात्रय पवार (वय३१), अश्विनी हणमंत पवार(वय२५), विक्रांत हणमंत पवार( वय ७) आदित्य हणमंत पवार (वय ५ सर्वजण रा.सर्वजण पवारवाडी, महूद बु॥ता. सांगोला) अशी जखमींची नावे आहेत. त्यातील हणमंत दत्तात्रय पवार व विक्रांत हणमंत पवार यांना मोठा मार लागला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पवारवाडी, येथे दत्तात्रय तायाप्पा पवार यांचे राहते घर असून रविवारी रात्रौ ८ वा.च्या सुमारास पवार कुटूंबीयांनी एकत्रित जेवण केले. यावेळी वडील दत्तात्रय पवार एका माळीत तर मुलगा हणमंत पवार पत्नी-दोन मुलांसह शेजारच्या खोलीत झोपले होते. दरम्यान रात्रौ ११ वा.च्या सुमारास अचानक अंगावर माळवद कोसळल्यानंतर आतून आरडा-ओरडण्याचा आवाज येवू लागल्याने वडील दत्तात्रय पवार जागे झाले असता आपल्या मुलाच्या अंगावर माळवद पडल्याचे पाहून मदतीसाठी शेजाऱ्यांना बोलावले. यावेळी माधव बाड, बाबासो पवार, शंकर पवार, वैभव आटपाडकर, नाथा नरळे आदी ग्रामस्थांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दत्तात्रय पवार, अश्विनी पवार, विक्रांत व आदित्य च्या अंगावरील माती, खांडे-दांडे, साहित्य बाजूला काढून त्यांना बाहेर काढले. यामध्ये हणमंत पवार यांचा हात फ्रॅक्चर झाला तर विक्रांतच्या डोक्याला मार लागून जखमी झाला. यावेळी दत्तात्रय पवार यांनी वेळ आली होती पण काळ आला नव्हता असे म्हणून देवाचे आभार मानले. अभिमान पवार यांनी सदर घटनेची माहिती गाव कामगार तलाठी यांना कळवूनही त्यांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे पवार कुटूंबीयांकडून संताप व्यक्त होत आहे.