ठाणे पोलीस ममता कुलकर्णीच्या घरी
By admin | Published: May 4, 2016 03:24 AM2016-05-04T03:24:22+5:302016-05-04T03:24:22+5:30
सुमारे २,५०० कोटींच्या इफे ड्रीन साठ्याप्रकरणी ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी ठाणे पोलिसांच्या रडारवर असून त्याची कथित पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्या मुंबईतील तिनही फ्लॅटची मंगळवारी
- जितेंद्र कालेकर , ठाणे
सुमारे २,५०० कोटींच्या इफे ड्रीन साठ्याप्रकरणी ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी ठाणे पोलिसांच्या रडारवर असून त्याची कथित पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्या मुंबईतील तिनही फ्लॅटची मंगळवारी पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र तेथे पोलिसांना कोणीही आढळले नाही. सोने शुद्धीकरणाच्या व्यवसायात येण्यासाठी मनोज जैन आणि विकी गोस्वामीच्या केनियामध्ये बैठका झाल्याचीही माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना ममताने तिच्यासह विकीवरील आरोप फेटाळले असले तरी तिची आणि विकीची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सत्य बाहेर येणार नसल्याचेही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यासाठीच अमली पदार्थविरोधी पथकातील एक पथक मंगळवारी ममताच्या वर्सोवाच्या आरसी कॉम्पलेक्समधील बि. नं. चार, रुम नं. १०१, २०१ आणि ७०१ या तिनही फ्लॅटमध्ये गेले होते. तेथे ती किंवा तिचा कोणताही प्रतिनिधी पोलिसांना भेटले नाहीत. पोलीस तिथे गेल्यानंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीच आल्याचे या इमारतीमधील काही पदाधिकाऱ्यांना वाटले.
ममताला काही वर्षांपूर्वी अशाच एका प्रकरणात अटक झाली होती. त्यावेळी या आरसी कॉम्पलेक्सची नाहक बदनामी झाली होती. या पथकाने जेंव्हा पोलीस असल्याचे सांगितल्यानंतर काही मंडळींनी काढता पाय घेतला तर काहींनी मोकळेपणाने माहिती देण्यास सुरुवात केली.
संजय शर्मा हा तिचे व्यवहार पाहतो. फ्लॅटच्या मेन्टनन्सपोटी तीन महिन्यांचे १३ हजार रुपये तो बँकेत जमा करत असतो. याठिकाणी पाच इमारती असून वर्षभरापूर्वीच सोसायटीची कमिटी बदलली आहे. तिन्ही फ्लॅटवर ममताच्या नावाची पाटी असली तरी ते नेमकी कोणाच्या नावावर आहेत? तिथे कोणाचे येणे जाणे असते? या संदर्भातील विचारपूस सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. वकिलांशी सल्लामसलत करुनच माहिती देऊ, अशी सावध उत्तरे पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. अर्थात, तपासात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी
ठाणे पोलिसांनी यावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.
१अटकेत असलेल्या पुनितचे दुबई कनेक्शन असल्याचेही काही दुवे पोलिसांच्या हाती लागले आहेत. एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीच्या ठाण्याच्या डोंबिवली, पालघरमधील तारापूर आदी ठिकाणी ११ कंपन्या आहेत. त्यापैकी कुठे गैरव्यवहार झाले का? याबाबतची कसून चौकशी करण्यात येत आहे.
२सोलापूरची एव्हॉन कंपनी तोट्यात जाऊन कर्जबाजारी झाल्याने केनियातील कच्चे सोने शुद्ध करण्याच्या व्यवसायात लक्ष केंद्रीत केले होते. त्यासाठीच केनियात विकी गोस्वामी बरोबर बैठक घेतल्याचा दावा एव्हॉनचा संचालक मनोज जैन याने पोलिसांच्या चौकशीत केला आहे.