वाराणशीच्या रस्त्यांवर ‘हाऊसफुल्ल शो’
By admin | Published: May 10, 2014 01:03 AM2014-05-10T01:03:26+5:302014-05-10T01:03:26+5:30
गुरुवारी जमलेली भव्य गर्दी बघितल्यानंतर शुक्रवारी वाराणशीकरांनी ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेचादेखील अनुभव घेतला.
वाराणशी : देशातील सर्वात मोठे निवडणूक ‘बॅटलफिल्ड’ झालेल्या वाराणशीच्या मैदानात ‘रोड शो’च्या माध्यमातून जनतेला राजकीय रंग अनुभवायला मिळत आहेत. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ गुरुवारी जमलेली भव्य गर्दी बघितल्यानंतर शुक्रवारी वाराणशीकरांनी ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेचादेखील अनुभव घेतला. केजरीवाल यांच्या ‘रोड शो’ला अपेक्षेहून जास्त प्रतिसाद लाभला. यावेळी केजरीवाल यांनी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ज्या नेत्याला मतदारांशी संवाद साधण्यासाठी २ तासदेखील काढता येत नाही असा ‘हेलिकॉप्टर’ उमेदवार काय कामाचा असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. अरविंद केजरीवाल यांनी मोदींप्रमाणेच बनारस हिंदू विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासूनच ‘रोड शो’ला प्रारंभ केला अन् वेगवेगळ््या टप्प्यांत त्यांच्यासोबत गर्दी जुळत गेली. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी १३ ठिकाणी निरनिराळे ‘पॉईन्ट्स’ बनविले होते. या ठिकाणी स्थानिक तसेच ‘आप’चे कार्यकर्ते ‘रोड शो’मध्ये सहभागी होत गेले. शेवटच्या काही ‘पॉईन्ट्स’मध्ये तर प्रचंड प्रमाणात गर्दी जमा झाली होती. यात स्थानिक नागरिकांसोबत तरुण, विद्यार्थी तसेच देशविदेशातून आलेल्या पत्रकारांचादेखील समावेश होता. केजरीवाल यांच्या ‘रोड शो’मध्ये ‘आप’च्या नेत्यांसोबतच भगवंंत मान, विशाल डदलानी, गुल पनाग या ‘सेलिब्रिटीज्’देखील उपस्थित होते. केजरीवाल यांनी दणदणीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. वाराणशीत मोदी विजयाचे दावे करीत आहेत. परंतु प्रचारासाठी ‘हेलिकॉप्टर’ने केवळ दोन तास येणारा उमेदवार खरोखरच जनतेच्या समस्या सोडविणार नाही. असा उमेदवार काय कामाचा हे वाराणशीतील जनतेला चांगल्या तºहेने समजले आहे या शब्दांत केजरीवाल यांनी आपले मत व्यक्त केले. या निवडणुकीत माझाच मोठ्या फरकाने विजय होणार आहे. मोदींबद्दल वाराणशीतील नागरिकांना सत्य कळले आहे. भाजपाकडून जातीधर्माचे राजकारण करण्यासोबतच प्रसारमाध्यमांना लाच देणे व हिंसा यासारखे प्रकारदेखील करण्यात येत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी लावला.