घरधनी गेला, पोटासाठी राबताहेत मायलेक!
By Admin | Published: September 16, 2016 01:47 AM2016-09-16T01:47:20+5:302016-09-16T01:47:20+5:30
दुसऱ्याच्या शेतात मजुुरीला जाऊन नंतर स्वत:च्या शेतात दाम्पत्यासह मुलेबाळे राबराब राबली. यंदा तरी कोरडवाहू जमिनीत काही उगवेल आणि त्यातून एकदाचे देण-घेणे उरकून टाकू
नरेंद्र जावरे, परतवाडा
दुसऱ्याच्या शेतात मजुुरीला जाऊन नंतर स्वत:च्या शेतात दाम्पत्यासह मुलेबाळे राबराब राबली. यंदा तरी कोरडवाहू जमिनीत काही उगवेल आणि त्यातून एकदाचे देण-घेणे उरकून टाकू, अशी त्यांना आशा होती. मात्र, निसर्गाची अवकृपा कायम होती. बँकेचे २५ हजारांचे कर्ज फेडण्याची स्थिती नाही. सततच्या काळजीने आरोग्याची वाताहत झाली. शेवटी मृत्यूच्या विचाराने जय मिळविला आणि घरातील फवारणीचे विषारी औषध स्वत:च्याच शेतात प्राशन केले. आशा इतकीच की आपल्या मृत्यूनंतर तरी कुटुंबाला काही आर्थिक मदत मिळेल नि त्यांची परिस्थिती सावरेल. पण, ही आशाही फोल ठरली. शेवटी स्वत:चे शेत पडिक ठेवून मागे उरलेले मायलेक आता दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जाऊन कसेबसे पोट भरत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. या गावातील गजानन अर्जुन मस्करे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाचे.
२५ वर्षांपूर्वी शिंदी बु. येथील अण्णाजी लिल्हारे यांच्या शीला नामक कन्येशी अकोट येथील गजानन अर्जुन मस्करे (३८) यांचा विवाह झाला. परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने गजानन मस्कटे सासरी शिंदी येथेच राहू लागले. पती-पत्नी दोघे ही मजुरी करून संसाराचा गाडा रेटत असताना पदरी दोन अपत्ये आलीत. शीला यांच्या वडिलांच्या मदतीने या दाम्पत्याने दोन एकर कोरडवाहू शेत अंजनगाव रेल्वेलाईन मार्गावर घेतले. मात्र, सततची नापिकी आणि वाढती महागाई यामुळे कोरडवाहू शेतीतील उत्पन्न पुरे पडत नव्हते. अखेरीस पती-पत्नी आणि मुले शेतीच्या कामावर जाऊन मेहेनत करुन पोट भरु लागले. मात्र, तरीही कर्जाच्या बोझ्याखाली दबून गजानन मस्करे यांना जीव द्यावा लागला.
मदतीच्या निव्वळ गप्पा
गजनान मस्करे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरी नेत्यांनी भेटी दिल्यात. मात्र, प्रत्यक्ष मदत मात्र दिली नाही. प्रशासनाने तर याची अजिबात दखल घेतली नाही. परिणामी मस्करे कुटुंबापर्यंत मदतीची दमडी देखील पोहोचली नाही. परतवाडा येथील अस्थिरोगतज्ज्ञ राजेश उभाड यांनी डॉक्टर फोरमकडून १० हजार रूपये तर कॉँगे्रसचे प्रकाश साबळे यांनी पाच हजार रूपयांची मदत मिळवून दिली. मेळघाट मतदारसंघातील लोकप्रतिनिधी या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देतील काय, हाच सवाल आहे.
दिवाळीत झाला कायमचा अंधार
दिवाळी दहा दिवसांवर येऊन ठेपली होती. ३० आॅक्टोबर २०१५ रोजी गजानन मस्करे नेहमीप्रमाणे दुसऱ्याच्या शेतात सकाळी ८ वाजता मजुरीच्या कामावर गेले. दुपारी १२.३० वाजता परत आले. थोडा वेळ विश्रांती घेऊन दीड वाजता स्वत:च्या दोन एकर कोरडवाहू शेतात फवारणीसाठी विषारी औषध घेऊन गेले आणि तासाभरात गजाननने विष घेऊन आत्महत्या केल्याची बातमी पसरली. शीलाबार्इंच्या संसारात कायमचा काळोख पसरला. म्हाताऱ्या आईच्या पदराने डोळे पुसत त्या आता कसेबसे आयुष्य रेटत आहेत.
२५ हजारांंसाठी गेला लाखमोलाचा जीव
गजानन मस्करे यांचेवर शिंदी बु. येथील स्टेट बॅँकचे वीस हजारांचे पीककर्ज घेतले होते. तर मुलीच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून साठ हजार रूपये उसने घेतले होते. दोन वर्षे कर्जाची परतफेड न केल्याने पाच हजार रुपये व्याजासह एकूण पंचवीस हजार रूपये रक्कम त्यांना फेडायची होती. जवळपास लाख रुपयांवर असलेले कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. तो कायमचा सोडविण्यासाठी त्यांनी शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करला.
आई-मुलगा कामाला
शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबाचे काय? याचे जिवंत उदाहरण शिंदी येथील मस्करे कुटुंबाचे देता येईल. पूजा पंकज बटवार (मुलगी) हिचे लग्न वडील जिवंत असताना झाले. दहावी अनुुत्तीर्ण पूजाला एक वर्षाचा मुलगा आहे. तर शिंदी येथील चंद्रमौळी झोपडीत पत्नी शीला व मुलगा राहुल राहतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दहावी नापास राहुल परतवाडा येथे कापड विक्रीच्या दुकानात तीन हजार रूपये महिन्याने कामाला जातो. मृत्यूनंतरही गजाननच्या घरातील दारिद्र्य कायम आहे.