घरे महागणार!
By Admin | Published: April 2, 2017 12:47 AM2017-04-02T00:47:34+5:302017-04-02T06:43:48+5:30
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वाढविलेले रेडीरेकनरचे दर शनिवारपासून लागू झाल्याने राज्यातील घरांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वाढविलेले रेडीरेकनरचे दर शनिवारपासून लागू झाल्याने राज्यातील घरांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
रेडीरेकनरच्या दरात सरासरी ५.८६ टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक ९.८२ टक्क्यांची वाढ अहमदरनगरमध्ये तर सर्वात कमी १.५० टक्के वाढ नागपूरमध्ये करण्यात आली आहे. पुणे महापालिका क्षेत्रासाठी ३.६४ तर पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी ४.४६ टक्के वाढ करण्यात आली असून पुणे ग्रामीण क्षेत्रात १५.३ टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्याची सरासरी वाढ ८.६० टक्के आहे. त्यामुळे शहरालगतच्या तसेच ग्रामीण भागातील मोक्याच्या जागांच्या किमती वाढणार असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी रेडीरेकनरच्या दरात सात टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. सध्या जमीन खरेदी विक्रीच्या आणि बांधकाम क्षेत्रात असलेली मंदीसोबतच नोटाबंदीचा बसलेला फटका याचा अभ्यास करुन ५.८६ टक्क्यांची वाढ सुचविण्यात आली. राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील ४१ हजार ६७८ गावांमध्ये ७.१३ टक्के, तर प्रभाव क्षेत्रातील १ हजार ७८८ गावांमध्ये ६.१२ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर २७ महापालिका क्षेत्रांमध्ये सरासरी ४.७४ टक्क्यांची वाढ झाली असल्याने शहरी व निमशहरी भागात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार वाढणार आहेत.
महापालिका क्षेत्रांचे चित्र पाहता सर्वाधिक वाढ अहमदनगरमध्ये तर त्या खालोखाल जळगाव (९.४५), नाशिक (९.३५) टक्के अशी वाढ झालेली आहे. नाशिकचा विकास आराखडा नुकताच मंजूर झाल्याने शेती झोनमधील जमिनी निवासी झोनमध्ये आल्या आहेत. त्यामुळे ही वाढ दिसून येत असल्याचे नोंदणी महानिरीक्षक डॉ. एन. रामस्वामी यांनी सांगितले. नवी मुंबईमध्ये झालेल्या कृत्रिम दरवाढीमुळे दर फुगवटा तयार झाला आहे. हा फुगवटा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. नवी मुंबई (१.६७), बृहन्मुंबई (३.९५), ठाणे (३.१८), मिरा भाइंदर (२.६६), कल्याण डोंबिवली (२.५६) उल्हासनगर (२.८८), भिवंडी निजामपूर (१.७१), वसई-विरार (२.०३), पनवेल (३.१७) अशी वाढ करण्यात आली आहे. मुंबई विभागाची एकूण वाढ ३.९५ टक्के झाली असून मागील वर्षी ही वाढ सात टक्के होती. पुणे विभागातील कोल्हापूर (३), सोलापूर (६.३०), सांगली-मिरज-कुपवाड (४.७०) अशी वाढ करण्यात आली असून पुणे विभागात एकूण ८.५० टक्के वाढ झाली होती. गेल्या वर्षी ही वाढ ११ टक्के होती.
विभागनिहाय सर्वाधिक वाढ नाशिकमध्ये (९.२०) झाली असून द्वितीय क्रमांकावर पुणे (८.५०) आहे. त्यानंतर अमरावती (६.३०), औरंगाबाद (६.२०), कोकण (४.६९), मुंबई (३.९५) अशी वाढ आहे. तर सर्वात कमी नागपूरमध्ये २.२० टक्के वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)