जादुटोण्यातून मारहाण झाल्याने अपमानित महिलेची आत्महत्या, सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2016 07:48 PM2016-07-25T19:48:01+5:302016-07-25T19:48:01+5:30

गावात तुम्ही जादुटोणा करता असा आरोप करीत जबर मारहाण व अपमानित झालेल्या राजोली येथील एका दाम्पत्यापैकी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

Housewife commits suicide, six arrested for kidnapping | जादुटोण्यातून मारहाण झाल्याने अपमानित महिलेची आत्महत्या, सहा जणांना अटक

जादुटोण्यातून मारहाण झाल्याने अपमानित महिलेची आत्महत्या, सहा जणांना अटक

Next

सहा जणांना अटक : राजोलीतील गावकऱ्यांचा पोलिसांवर रोष
केशोरी (गोंदिया) : गावात तुम्ही जादुटोणा करता असा आरोप करीत जबर मारहाण व अपमानित झालेल्या राजोली येथील एका दाम्पत्यापैकी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गावात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी गहाणे कुटुंबियातील ६ लोकांना अटक केली तर एक जण फरार आहे. यामुळे गावातील तणावपूर्ण वातावरण शांत झाले. मात्र याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला असहकार्याची भूमिका घेतल्याने नागरिकांनी त्यांच्यावर चांगलाच रोष व्यक्त केला.

प्राप्त माहितीनुसार, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राजोली येथील सुभद्रा (४०) आणि गुरूदेव उईके (४५) हे दाम्पत्य गावात जादुटोणा करीत असल्याचा संशय घेऊन गहाणे कुटुंबातील लोकांनी त्यांना दि.१९ ला मारहाण केली. याची तक्रार देण्यासाठी हे दाम्पत्य राजोली सशस्त्र दूरक्षेत्र चौकीवर गेले असता त्यांना तेथील शिपायाने केशोरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. दि.२० ला उईके दाम्पत्य केशोरी ठाण्यात गेले. मात्र तेथील कर्मचाऱ्याने त्यांच्याशी उद्धट वागून त्यांनाच दमदाटी केली. एवढेच नाही तर त्यांना उलटसुलट प्रश्न विचारून तेथून केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.

घरी परतल्यानंतर दि.२१ व २२ ला पुन्हा गहाणे परिवारातील सदस्यांकडून उईके यांना पोलिसात तक्रार केली म्हणून दमदाटी झाली. यामुळे प्रचंड तणावात असलेल्या या दाम्पत्याने दि.२३ ला गावातच असलेल्या सुभद्राच्या भावाकडे आश्रय घेतला. मात्र सततच्या अपमानाने अस्वस्थ झालेल्या सुभद्राने दि.२४ च्या पहाटे घरून बाहेर पडून एका विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
इकडे ती अचानक गायब झाल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. पोलिसांना कळविण्यात आले. मात्र यावेळीही पोलिसांनी गहाणे कुटुंबियांच्या दबावात येऊन कोणतीही चौकशी केली नाही, असा नातेवाईकांचा आरोप आहे.

दरम्यान संशय आल्याने विहिरींमध्येही शोध घेतला असता एका विहिरीत गाळाला सुभद्राचा मृतदेह लागला. यामुळे गावकऱ्यांचा रोष आणखीच वाढला. जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका गावकरी व नातेवाईकांनी केली.

वाढत चाललेला तणाव व आणि गावकऱ्यांचा रोष पाहून अखेर केशोरी पोलिसांनी या प्रकरणी भादंविच्या कलम ३०६, ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणात महिलेचा छळ केल्याप्रकरणी आरोपी मंगेश गहाणे, महेश गहाणे, डॉ.सत्तू गहाणे, भरत गहाणे, रतिराम गहाणे व श्यामराव गहाणे यांचे जावई पुरूषोत्तम तुकाराम बावनथडे रा.सोनारंजी (जि.गडचिरोली) यांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी फरार आहे.

Web Title: Housewife commits suicide, six arrested for kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.