अशी करा गृहनिर्माण संस्थांची नोंदणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 03:48 AM2018-08-12T03:48:08+5:302018-08-12T03:48:24+5:30
महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन आणि विकास) नियम, २०१७ अन्वये सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी करण्याची जबाबदारी किंवा बंधन प्रवर्तकावर टाकण्यात आले आहे.
- रमेश प्रभू
महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन आणि विकास) नियम, २०१७ अन्वये सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी करण्याची जबाबदारी किंवा बंधन प्रवर्तकावर टाकण्यात आले आहे. नियम ९ (एक) (१) अन्वये प्रवर्तक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० खाली सहकारी गृहनिर्माण संस्थेची किंवा कंपनीची किंवा कोणत्याही इतर कायदेशीर संस्थेची अशा इमारत/ विंगमधील सदनिका खरेदीदारांच्या एकूण संख्येच्या ५१ टक्के खरेदीदारांनी त्यांच्या सदनिका आगाऊ नोंदविल्या असतील त्या दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत नोंदणी करण्यासाठी निबंधकाकडे अर्ज सादर करील.
यापूर्वी प्रवर्तक/ विकासक सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी न करता निघून जात होते आणि संस्था नोंदणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी सदनिकाधारकांवर येऊन पडत होती. नियम ९ (एक)(३) अन्वये जर प्रवर्तकाने, सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था गठीत करण्यात कसूर केली असेल तर, महारेरा प्राधिकरण आदेशाद्वारे प्रवर्तकास अशी कायदेशीर संस्था गठीत करण्यासाठी अर्ज करण्याचा निर्देश देईल किंवा सदनिकाधारकांना प्राधिकृत करील.
सहकारी संस्थांच्या नोंदणीच्या प्रयोजनासाठी मुंबई शहराची महानगरपालिकेच्या प्रभागांनुसार विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाचे उप निबंधक/ साहाय्यक निबंधक हे त्या त्या विशिष्ठ विभागाचे प्राधिकारी आहेत. आपली संस्था ज्या विभागात असेल त्या विभागाच्या प्राधिकाऱ्यांकडे संस्था नोंदणीसाठी आपण संपर्क साधू शकता.
सर्वप्रथम संबंधित विभागाच्या निबंधकांकडे आपण प्रस्तावित संस्थेचे नाव राखीव ठेवून बँकेत खाते उघडण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज विहित नमुन्यात मुख्य प्रवर्तकाने निबंधकांकडे सादर करावयाचा आहे. त्यासाठी सदस्यांच्या प्राथमिक सभेत मुख्य प्रवर्तकाची निवड होणे आवश्यक आहे. बँकेत खाते उघडण्याच्या परवानगीसाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
१. प्रस्तावित संस्थेचे नाव राखून ठेवून बँक खाते उघडण्यासाठी विहित नमुन्यात परवानगी अर्ज त्यावर ५ रु. किमतीचा न्यायालय फी मुद्रांक चिकटवून निबंधकाकडे सादर करावा.
२. प्राथमिक सभेच्या कार्यवृत्ताची विहित नमुन्यात प्रत.
३. मूळ जमीन मालक आणि बिल्डर/ प्रवर्तक यांच्यात झालेल्या विक्री खत/ विकास करारनामा याची फोटो प्रत.
४. ७/१२ उतारा किंवा मालमत्ता नोंदणी पत्रकाची फोटो प्रत.
५. मूळ मालकाने बिल्डर, प्रवर्तक यांना कुल मुखत्यार पत्र दिले असल्यास त्याची प्रत.
६. प्रस्तावित संस्थेची तपशीलवार योजना आणि तिचे स्वरूप.
७. प्रस्तावित सदस्यांची यादी.
नोंदणीसाठी प्रस्तावित संस्थेचे नाव राखून ठेवून बँक खाते उघडण्यासाठी परवानगी मिळाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत अधिकृत नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. काही अपरिहार्य कारणामुळे विहित कालमर्यादेत प्रस्ताव सादर करणे शक्य झाले नाही, तर मुख्य प्रवर्तकाने नोंदणी प्रस्ताव सादर करण्यासाठी कालमर्यादा वाढवून मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी मुख्य प्रवर्तकाने पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत.
१. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ नियम ४(१) अन्वये विहित नमुन्यात नोंदणीसाठीचा अर्ज - प्रपत्र अ (परिशिष्ट अ)
२. प्रपत्र ब : विहित नमुन्यात प्रस्तावित संस्थेची माहिती.
३. प्रपत्र क : प्रवर्तक सदस्यांची माहिती.
४. प्रपत्र ड : विहित नमुन्यात लेखा पत्रके.
५. प्रस्तावित संस्थेची तपशीलवार योजना आणि तिचे स्वरूप.
६. बचत खात्याचे ताळेबंद पत्रक (प्रत्येक प्रवर्तक सदस्याचे रु. ५००/- भाग भांडवल आणि अतिरिक्त रु. १००/- प्रवेश शुल्क.
७. शासकीय कोषागारात सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी रु. २५,००/- भरल्याचे मूळ चलन.
८. मूळ जमीन मालक आणि बिल्डर/ विकासक यांच्यामध्ये झालेल्या विक्री करारनाम्याची किंवा विकास करारनाम्याची फोटो प्रत.
९. ७/१२ उतारा किंवा मालमत्ता नोंदणी पत्रकाची फोटो प्रत.
१०. मूळ जमीन मालकाने बिल्डर प्रवर्तकाला दिलेल्या कुल मुखत्यार पत्राची फोटो प्रत.
११. जर जमीन सार्वजनिक न्यासाची असेल तर धर्मादाय आयुक्तांच्या ना हरकत प्रमाणपत्राची प्रत.
१२. वकिलाकडून घेतलेल्या जमीन शोध अहवालाची किंवा हक्क प्रमाणपत्राची प्रत.
१३. नागरी कमाल जमीन धारणा अधिनियमान्वये सक्षम प्राधिकाºयाने प्रसुत केलेल्या आदेशाची प्रत.
१४. महानगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकाºयानी संमत केलेल्या बांधकाम नकाशाची प्रत.
१५. महानगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकाºयानी दिलेल्या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राची प्रत किंवा बांधकाम पूर्णत्वाच्या प्रमाणपत्राची प्रत.
१६. प्रस्तावित संस्थेच्या इमारतीच्या बांधकामाला पुष्टी देणारे वास्तुविशारदाचे प्रमाणपत्र.
१७. रु. २०/-च्या मुद्रांक कागदावर किमान १० सदस्यांचे प्रतिज्ञापत्र की ते संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहतात आणि त्या कार्यक्षेत्रात त्यांचे निवासी घर, मोकळा भूखंड त्यांच्या किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांच्या नावे नाही.
१८. रु. २०/-च्या मुद्रांक कागदावर विहित नमुन्यात मुख्य प्रवर्तकाचे हमी पत्र.
१९. रु. २०/-च्या मुद्रांक कागदावर विहित नमुन्यातील झेड प्रपत्रात बिल्डर प्रवर्तकाचे अ ब क ड तक्त्यातील माहितीसह हमी पत्र.
तक्ता अ : विक्री झालेल्या सदनिकांची संख्या. ज्यांना विक्री केली त्यांची नावे. सदनिकांचे क्षेत्र आणि त्यांची किंमत.
तक्ता ब : विक्री न झालेल्या सदनिकांची संख्या आणि त्यांचे क्षेत्रफळ.
तक्ता क : सदनिका विकलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांच्याकडून मिळालेली एकूण रक्कम.
तक्ता ड : खर्चाचा तपशील, सदनिका विक्री करण्यात आलेल्या इसमांची नावे. भाग भांडवलाची रक्कम. प्रवेश शुल्काची रक्कम आणि सदनिकेची किंमत.
२०. सदनिकाधारक आणि बिल्डर प्रवर्तक यांच्यामध्ये निष्पादित झालेल्या नोंदणीकृत करारनाम्याची प्रत.
२१. संस्था नोंदणीसाठी केलेल्या अर्जात उल्लेखिलेल्या प्रवर्तक सदस्यांच्या सदनिकेच्या नोंदणीच्या शुल्काबाबत पैसे प्रदान केल्याच्या पावतीची आणि मुद्रांक शुल्क भरल्याच्या पावतीची फोटो प्रत.
२२. आदर्श उपविधी क्रमांक १७५च्या शेवटी किमान १० प्रवर्तक सदस्यांच्या सह्या असणे आवश्यक आहे.