आयटीत तरतूद ३२५ कोटींची, घोटाळे २५ हजार कोटींचे कसे?; भाजपाचा संजय राऊतांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:44 AM2022-02-18T11:44:56+5:302022-02-18T11:45:36+5:30
दोन्हींची बेरीज केली तरी ती १,०८० कोटी ४ लाख रुपये इतकीच होते. त्यातील ८० टक्के कामे ही केंद्रीय निधीमधून होतात आणि केंद्रीय योजनांतर्गत असतात.
मुंबई : राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या काळात ३५५ कोटी ८६ लाख रुपयांचीच तरतूद झाली. मग या खात्यात २५ हजार कोटींचे घोटाळे कुठून झाले, असा प्रश्न तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विचारला आहे.
माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत येणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान महामंडळामार्फत विविध शासकीय विभागांची ७२४ कोटी रुपयांची कामे या काळात करण्यात आली.
दोन्हींची बेरीज केली तरी ती १,०८० कोटी ४ लाख रुपये इतकीच होते. त्यातील ८० टक्के कामे ही केंद्रीय निधीमधून होतात आणि केंद्रीय योजनांतर्गत असतात. त्या-त्या वर्षी करण्यात आलेली तरतूद आणि खर्चाचा तपशील ऑन रेकॉर्ड आहे, याकडे या विभागाचे तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष वेधले. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले की, ३५६ कोटींची तरतूद अन् घोटाळे २५ हजार कोटींचे हे न समजण्यासारखे आहे. खासदार संजय राऊत हे आधी मनोरंजन करायचे, आता हवा‘बाण’ सोडत आहेत. कायद्याच्या कसोटीवर असे बेताल आरोप टिकणार नाहीत.