ओबीसींची गणना आडनावांवरून कशी? फडणवीस; भुजबळ, वडेट्टीवार यांनीही घेतली हरकत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 06:00 AM2022-06-14T06:00:13+5:302022-06-14T06:00:30+5:30
ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सध्या गावोगावी सुरू असून त्यात ओबीसींची संख्या ही आडनावांवरून घेतली जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.
मुंबई :
ओबीसींचा इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सध्या गावोगावी सुरू असून त्यात ओबीसींची संख्या ही आडनावांवरून घेतली जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही आडनावांवरून डाटा गोळा करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. मात्र, केवळ आडनावांवरून असा डाटा गोळा केला जाणार नाही, अचूक माहिती घेतली जाईल, अशी ग्वाही बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या समर्पित आयोगाकडून हा डाटा तयार केला जात आहे. मात्र, ग्रामविकास विभागाच्या यंत्रणेकडून त्यासाठी मदत करताना आडनावांवरून ओबीसींची संख्या ठरविली जात असल्याची बाब समोर आली आहे.
फडणवीस पत्रपरिषदेत म्हणाले की, या कामात प्रचंड गोंधळ सुरू आहेत. ओबीसींची संख्या घटलेली दिसेल, अशा पद्धतीने हे काम होते आहे. हे सरकार नेहमीच उशिरा जागे होते, म्हणून मी आजच सरकारला इशारा देतो आहे. याचा संपूर्ण तपशील योग्य वेळी मी देईनच.
मध्यप्रदेश सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे काम केले. एकदा हे सर्वेक्षण पूर्ण होऊन, न्यायालयात सादर झाले की मग माघार घेता येणार नाही आणि ओबीसींचे मोठे नुकसान झालेले असेल. त्यामुळे आजच सावध व्हा. अन्यथा भाजपला पुन्हा मैदानात उतरावे लागेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनीही आडनावांवरून डाटा गोळा करणे अयोग्य असल्याचे सांगितले. आरक्षणावरून राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सरकार आणि विराेधकांमध्ये आराेप केले जात आहेत.
भुजबळ म्हणाले की, अनेक समाजांमध्ये एकसारखी आडनावे असतात. त्यामुळे विशिष्ट आडनावाची व्यक्ती ही विशिष्ट समाजाची असल्याचा तर्क काढणे योग्य नाही. ओबीसींची संख्या या डाटामध्ये चुकीची आली तर त्याची फळं ओबीसींना आयुष्यभर भोगावी लागतील. त्यामुळे आयोगाने सर्व प्रकारची काळजी घेऊनच डाटा गोळा करणे अपेक्षित आहे. विविध राजकीय पक्ष, समाजाच्या ओबीसी संघटना आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी डाटा गोळा करणारी यंत्रणा अचूक काम करते आहे की नाही यावर लक्ष ठेवावे असे आवाहन भुजबळ यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांनी इम्पिरिकल डाटासंदर्भात उपस्थित केलेले मुद्दे काहीअंशी खरे आहेत. लाखो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत हा डाटा गोळा करत आहोत. आडनावांवरून डाटा गोळा करू नका, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. माझी या बाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे.
- विजय वडेट्टीवार, ओबीसी कल्याण मंत्री.