संज्ञा कशा बनतात?

By admin | Published: February 26, 2017 02:17 AM2017-02-26T02:17:29+5:302017-02-26T02:17:29+5:30

कोणताही शब्द रुळायला काही वर्षे जावी लागतात आणि तोवर लोकांनी तो सातत्याने वापरात ठेवला पाहिजे. तरीही शब्दकोशातील काही शब्द मागे पडतात

How are the words formed? | संज्ञा कशा बनतात?

संज्ञा कशा बनतात?

Next

- अ. पां. देशपांडे

कोणताही शब्द रुळायला काही वर्षे जावी लागतात आणि तोवर लोकांनी तो सातत्याने वापरात ठेवला पाहिजे. तरीही शब्दकोशातील काही शब्द मागे पडतात आणि म्ग कालांतराने तो शब्द मागे पडतो. पदनाम कोश अस्तित्वात आला, तेव्हा लोक हैराण झाले होते. आचार्य अत्रे यांनी तर त्याला ‘पदनाम कोशा’ऐवजी ‘बदनाम कोश’ म्हणून हिणवले होते.

परिभाषा संचालनालयातर्फे शासनाने मराठीत सिद्ध केलेली परिभाषा शालेय पाठ्यपुस्तकात, वर्तमानपत्रात व वक्त्यांनी आपल्या भाषणातही वापरावी, अशी शासनाची सर्वांना विनंती आहे. बालभारती हे शासनाचेच एक खाते शालेय पाठ्यपुस्तके प्रकाशित करीत असल्याने, पाठ्यपुस्तकात परिभाषा कोशातील शब्द वापरले जात आहेत. यातील काही संज्ञा वर्तमानपत्रांनी व वक्त्यांनी जरूर उचलल्या आहेत. मात्र, काही अवघड संज्ञा वर्तमानपत्रांनी आणि वक्त्यांनी वापरल्या नाहीत. उदाहरणार्थ, मोठ्या मेंदूला ‘प्रमस्तिष्क’ आणि छोट्या मेंदूला ‘अनुमस्तिष्क’ म्हणतात. हे शब्द लोकांना अवघड वाटले. १९६५ च्या सुमारास शासनाने काढलेल्या पदनाम कोशात इंजिनीअरला ‘अभियंता’ हा सुचवलेला शब्द तेव्हा लोकांना अवघड वाटला. लोक म्हणायचे, ‘अभियंता’ या शब्दापेक्षा सरळ ‘इंजिनीअर’ असेच म्हणा ना. जवळ जवळ १० वर्षांनी मग लोकांनी तो शब्द स्वीकारला. कारण शासनाने तो सातत्याने लावून धरला.
कोणताही शब्द रुळायला काही वर्षे जावी लागतात आणि तोवर लोकांनी तो सातत्याने वापरात ठेवला पाहिजे. तरीही शब्दकोशातील काही शब्द मागे पडतात आणि कालांतराने तो शब्द मागे पडतो. पदनाम कोश अस्तित्वात आला, तेव्हा लोक हैराण झाले होते. आचार्य अत्रे यांनी त्याला ‘पदनाम कोशा’ऐवजी ‘बदनाम कोश’ म्हणून हिणवले होते.
या परिभाषा समितीत इंग्रजीतील संज्ञा मराठीत आणताना चर्चा कशी होते, त्याची काही उदाहरणे मी येथे देतो. रसायनशास्त्राच्या समितीमध्ये ‘प्लास्टिक’ या शब्दावर चर्चा चालू होती. ‘प्लास्टिक’ हा शब्द विशेषण म्हणून वापरल्यास, त्याला अ) आकारी म्हणजे आकार देण्यास योग्य असा किंवा आ) घडण सुलभ हे दोन पर्याय निवडण्यात आले, पण नाम म्हणून ‘प्लास्टिक’ हा शब्द रूढ असल्याने तो तसाच ठेवण्यात आला.
दुसरा शब्द क्रोमोग्राफी. क्रोम म्हणजे कलर-वर्ण आणि ग्राफी म्हणजे आलेखन. म्हणून क्रोमोटोग्राफीला वर्णलेखन हा पर्याय घेण्यात आला. ग्राफचा अर्थ आलेख असा जरी होत असला, तरी या संदर्भात लेखन हा शब्द सुटसुटीत व अर्थाला पुरेसा आहे. एकदा तो निश्चित झाला की, कॉलम क्रोमोटोग्राफीला स्तंभ वर्ण लेखन, सर्क्युलर पेपर क्रोमोटोग्राफीला चक्रिय कागद वर्णलेखन आणि पार्टिशन क्रोमोटोग्राफीला विभाजन वर्ण लेखन हे शब्द ठरवणे सोपे झाले.
तिसरा शब्द पिगमेंट, डाय आणि कलर. या तिन्हीचा ढोबळ अर्थ रंग असला, तरी शास्त्रीयदृष्ट्या त्यांच्या अर्थछटेत फरक आहे. ते लक्षात घेऊन मग वर्णक, रंजक व रंग असे पर्याय ठरवण्यात आले. काही वेळी चर्चा रंजक स्वरूपही घेत असे. हा ‘रंजक’ शब्द आणि मघाशी वापरलेला ‘रंजक’ यात फरक आहे.
अनंत काणेकर हे साहित्यिक एका समितीवर असताना, लाउडस्पीकरला मराठी शब्द ठरवायचा होता. ते म्हणाले, ‘समितीत कोणीतरी ‘बोंबल्या’, ‘ओरड्या’ असे शब्द सुचवले, पण ते सभ्य वाटेनात आणि शेवटी ‘ध्वनिवर्धक’ शब्द तयार झाला.’ तसेच काणेकर एकदा खंडाळ्याला आचार्य अत्र्यांच्या बंगल्यावर उतरले होते. संध्याकाळी कोणी साहित्यिक डेक्कन क्वीनने येणार होते. त्यासाठी त्यांचा रखवालदार हातात कंदील घेऊन काणेकरांसह स्टेशनावर गेला. थोड्या वेळाने किंकाळी फोडीत डेक्कन क्वीन आली. ते ऐकल्याबरोबर रखवालदार म्हणाला, ‘आली रे आली डंकीण आली.’ काणेकर म्हणाले, ‘तो ‘डंकीण’ शब्द मला एवढा भावला की, त्यापुढे दख्खनची राणी फिक्की पडली.’
प्रा. रा. भि. जोशी हे साहित्यिक वाङ्मय समीक्षा समितीवर मराठी विज्ञान परिषदेचे सदस्य म्हणून होते. विज्ञान विषयाबाहेरच्या ज्या समित्या होत्या, उदा. तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, वाङ्मय समीक्षा इत्यादी यावरही मराठी विज्ञान परिषदेने आपला प्रतिनिधी पाठवावा, असा शासनाचा आग्रह असे. मग मराठी विज्ञान परिषदेच्या सभासदात या विषयांचे जे प्राध्यापक होते, त्यांना परिषदेने आपले प्रतिनिधी म्हणून अशा समित्यांवर पाठवायला सुरुवात केली.
असे प्रतिनिधी पाठवायचे की नाही, यावर मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यकारिणीत चर्चा झाली होती. शासनाचा आग्रह, तशा विषयांच्या प्राध्यापकांची परिषदेच्या सभासदात उपलब्धता, याबरोबरच असे प्राध्यापक परिषदेचे सभासद असल्याने, ते परिषदेची पत्रिका वाचत असल्याने, तसेच विज्ञान त्यांच्या कानावरून जात असल्याने, आपण त्यांना अशा समित्यांवर पाठवावे, या मागणीला बळकटी आली.

Web Title: How are the words formed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.