येऊ कशी कशी मी नांदायला हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 03:18 AM2017-04-07T03:18:25+5:302017-04-07T03:18:25+5:30

महिलांना डोक्यावर हंडे-कळशा घेऊन मैलोनमैल पायपीट करावी लागत असल्याने या टंचाईग्रस्त गावात मुली देण्यास चक्क नकार दिला जात आहे.

How are you going to be ... | येऊ कशी कशी मी नांदायला हो...

येऊ कशी कशी मी नांदायला हो...

googlenewsNext

संजय कांबळे,
बिर्लागेट- भातसा, बारवी, उल्हास, काळू अशा बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या परिसरातील रायते, सांगोडा, पिंपळोली आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याकरिता महिलांना डोक्यावर हंडे-कळशा घेऊन मैलोनमैल पायपीट करावी लागत असल्याने या टंचाईग्रस्त गावात मुली देण्यास चक्क नकार दिला जात आहे.
आतापर्यंत मुलाची नोकरी, घर, जमीनजुमला याकरिता बहुसंख्य वधूपक्षाचा आग्रह असायचा, मात्र आता घरात पाण्याची सोय असेल तरच पुढची बोलणी करू, असा पावित्रा मुलींच्या पालकांनी घेतल्याने कल्याण ग्रामीण भागातील वाड्या पाड्यातील गावातील मुलांची लग्ने होतात की नाही, या कल्पनेने त्यांच्या पालकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
तुळशी विवाहानंतर सर्वत्र लगीनघाई सुरु होते. मुली पाहणे, देणे-घेणे बस भाडे, मानपान, मंडप, बॅण्डबाजा, बँजो, डिजे याचे बुकिंग सुरू होते. पत्रिका छापणे, त्या वेळीच वाटणे याची लगबग गावागावात दिसते. काही मुलींचे पालक लग्नाचा भरमसाठ खर्च करुन अक्षरश: कर्जबाजारी होतात. मात्र इतका खर्च करूनही लग्नानंतर आपल्या मुलीला आयुष्यभर डोक्यावरून पाण्याचे हंडे-कळशा वाहाव्या लागणार असतील तर अशा टंचाईग्रस्त गावांत त्यांची लग्ने करायची कशाला, असा त्यांच्या पालकांचा सवाल आहे.
कल्याण ग्रामीण भागातील ४१ ग्रामपंचायतीमधील ६६ गावांमधील वाड्यापाड्यातील लोकांकरिता एक हजार ८५ जलस्रोत असून यामध्ये हातपंप, सार्वजनिक विहिरी, नळपाणी पुरवठा योजना यांचा समावेश आहे. बहुतेक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनी पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे या कालबाह्य सोईसुविधा असून नसल्यासारख्या आहेत.
भातसा, बारवी, काळू व उल्हास अशा चार बारमाही वाहणाऱ्या नद्यांच्या परिसरातील या गावांमध्ये उन्हाळ््यात महिलांना डोक्यावरुन हंडे-कळशा वाहव्या लागतात. रात्री-अपरात्री पाणी आणायला जावे लागते. सांगोडा गावांतील महिला पाणी आणण्यास गेली असता सर्पदंश होऊन गेली तर पिंपळोली गावातील कमलाबाई राहणे यांचा विंचू दंशाने जीव गेला.
डोक्यावरून पाणी वाहण्यात आयुष्य गेल्याने महिलांच्या डोक्याचे केस गेल्याचे सरपंच सुनीता गायकर म्हणाल्या. मुलगा गरीब असला तरी चालेल, परंतु गावात, घरात पाण्याची सोय पाहिजे, असे विवाहेच्छुक मुलीचे पालक गणपत हिंदोळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
>मुलीच्या सुखासाठीच घरच्यांचा विचार
पाणी टंचाई, पीक, जनावरे याची वाताहत, यामुळे अशा गावात मुलगी द्यायला, नापसंती असल्याचे अ‍ॅड. सुनील गायकर यांनी सांगितले तर मुलीच्या सुखासाठी तिच्या घरच्यांनी असा विचार केला तर बिघडले कुठे? असा प्रश्न उशीद गावचे सुरेश गायकवाड यांनी विचारला. कल्याणच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई नाही असा विपरीत दावा कल्याण पाणीपुरवठा विभागाने केला कशाला, असा त्यांच्या पालकांचा सवाल आहे.

Web Title: How are you going to be ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.