सारेच कसे शत्रू..?
By admin | Published: June 18, 2016 01:11 AM2016-06-18T01:11:49+5:302016-06-18T01:11:49+5:30
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेची ५० वर्षांपूर्वी स्थापना झाली. सहदेव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत श्रीफळ वाढवले.
- संदीप प्रधान
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेची ५० वर्षांपूर्वी स्थापना झाली. सहदेव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत श्रीफळ वाढवले. स्थापनेच्या दिवशीच सदस्य नोंदणी १० हजारांच्यापेक्षा जास्त झाली. यावरून त्याकाळी मराठी माणसांवर नोकऱ्यांमध्ये होणाऱ्या अन्यायाची मनामनातील धग किती तीव्र होती, ते स्पष्ट दिसते. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे हे हजर होते.
देशात ४३ प्रमुख प्रादेशिक पक्ष असून दक्षिणेतील काही राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांचे स्थान नगण्य आहे. त्या तुलनेत शिवसेनेचा विचार केला तर राज्याची सत्ता काबीज करण्याकरिता शिवसेनेला स्थापनेनंतर २९ वर्षे वाट पहावी लागली. साडेचार वर्षे शिवसेना सत्तेत राहिली तेव्हा भाजपासोबत सत्ता वाटून घ्यावी लागली. त्यामुळे तसे पाहिले तर मराठी माणसांच्या जिव्हाळ््याच्या मुद्द्याला हात घालूनही शिवसेना द्रमुक, अण्णाद्रमुक या पक्षांसारखी दीर्घकाळ सत्तेवर राहिली नाही. ठाणे महापालिकेत स्थापनेनंतर एक वर्षात शिवसेनेची सत्ता आली. सध्या ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे तेथील सत्ता काबीज करण्याकरिताही शिवसेनेला १९८५ साल उजाडले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर त्यावेळी मुंबईत ताकदवान असलेल्या कम्युनिस्टांबरोबर त्यांचा रक्तरंजीत संघर्ष झाला. कृष्णा देसाई यांच्या हत्येमुळे शिवसेना आणि राडेबाजी हे समीकरण तयार झाले व आजही ते रूढ आहे. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना कम्युनिस्टांचे वर्चस्व मोडून काढायचे असल्याने त्यांनी शिवसेनेला हाताशी धरल्यामुळे ‘वसंतसेना’, अशी शिवसेनेची हेटाळणी केली गेली.
मुंबईतील गिरणगाव आणि तेथील कामगार हे सत्तर व ऐंशीच्या दशकातील या शहराचे वैभव आणि ताकद होती. राज्यकर्त्यांची आणि गिरणी मालकांची वक्रदृष्टी झाल्याने गिरण्यांच्या जमिनी निवासी व व्यापारी बांधकामाकरिता मोकळ््या करण्याचे षडयंत्र रचले गेले. त्यावेळी या कामगारांनी दत्ता सामंत यांचे नेतृत्व स्वीकारले आणि ठाकरे यांच्याकडे पाठ फिरवली. गिरणी कामगारांचा संप चिघळला. हजारो कामगार देशोधडीला लागले. या संपाने गँगवॉरपासून डान्सबारपर्यंत अनेक अनिष्ट बाबी जन्माला घातल्या. ज्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा लढा देण्याकरिता शिवसेना स्थापन झाली तो मराठी माणूस झपाट्याने उपनगराकडे फेकला गेला. मुंबईत जसे झपाट्याने बदल झाले तसे ते शिवसेनेतही झाले. वडापाव खाऊन पक्षाकरिता रक्त आटवणारा शिवसैनिक हळूहळू बाजूला फेकला गेला आणि बांधकाम व्यवसायापासून केबल व्यवसायापर्यंत अनेक धंद्यात मनगटशाहीच्या जोरावर पाय रोवलेल्या शिवसैनिकांचा पक्षात दबदबा वाढला. याच बदलांच्या ओघात मनाजोगी पदे न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या विरोधात बंड केले तर मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नारायण राणे यांनी उद्धव यांच्या विरोधात दंड थोपटले. अर्थात या दोघांनाही मर्यादीत राजकीय यश लाभले. मात्र ज्या शिवसेनेत एकेकाळी ‘बंड’करण्याला मृत्यूदंडाची शिक्षा होती त्या शिवसेनेत सध्या बंडोबांचे हारतुरे देऊन लाड सुरु झाले. महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचा उदय झाल्याने त्यापूर्वीपासून शिवसेनेत असलेले राज ठाकरे हे नाराज झाले. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यावर तर तेथील असंतुष्टांना शिवसेनेत लाल पायघड्या अंथरल्या जाऊ लागल्या. बाळासाहेब हे काळाचा अचूक वेध घेणारे नेते होते. त्यामुळे शहाबानो प्रकरण व राम मंदिर आंदोलनाचे ढग राजकीय अवकाशात जमू लागताच त्यांनी हिंदुत्वाची गर्जना केली. ही दूरदृष्टी सध्याच्या नेतृत्वाकडे दिसत नाही.