सेक्स रॅकेटमधील आरोपींना जामीन कसा?
By admin | Published: April 20, 2017 04:38 AM2017-04-20T04:38:35+5:302017-04-20T04:38:35+5:30
अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्या वयात आल्यानंतर त्यांना देहविक्री किंवा डान्स बारमध्ये काम करण्यास भाग
मुंबई : अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्या वयात आल्यानंतर त्यांना देहविक्री किंवा डान्स बारमध्ये काम करण्यास भाग पाडणाऱ्यांना जामीन कसा मिळू शकतो? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत धारेवर धरले. कनिष्ठ न्यायालयाने जामीन दिला तर सरकारने अपील का केला नाही? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी ठेवली आहे.
एका २४ वर्षीय तरुणीने उच्च न्यायालयात सेक्स रॅकेटविरुद्ध याचिका दाखल करून तिने नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
याचिकेनुसार, तिच्या आई-वडिलांनी तिला देहविक्री करण्यास भाग पाडले. त्यासाठी तिला दुबईतही पाठवण्यात आले. या कामाला कंटाळलेल्या मुलीने घरातून पळही काढला. मात्र तिला पुन्हा तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. एकेदिवशी तिला तिचे हे आई-वडील खरे आई-वडील नसल्याचे समजले. ती लहान असताना तिचे उत्तरप्रदेशमधून अपहरण करण्यात आले आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे अपहरणकर्त्यांचेच नाव आई-वडील म्हणून दाखवण्यात आले. ही बाब समजताच पीडितेने घरातून पळ काढला. यासंदर्भात तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली. मात्र पोलिसांनी काहीही केले नाही.
याप्रकरणात सात आरोपी आहेत. मात्र त्यातील तीन जणांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तर चौघांचा जामीन मंजूर झाला, ही बाब पीडितेच्या वकिलांनी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली.
‘एवढ्या गंभीर प्रकरणातील आरोपींना जामीन मिळतोच कसा?’ असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केल्यावर सरकारी वकिलांनी कनिष्ठ न्यायालयाने जामीन दिल्याचे सांगितले. ‘न्यायालयाचे जामीन दिला तर तुम्हाला त्याविरुद्ध अपील करता आला नाही? तुम्ही ही केस गांभीर्याने घेतली नाही. अशा अनेक मुली असतील,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने याप्रकरणी गुरुवारी महाअधिवक्त्यांना उपस्थित राहण्यास सांगितले.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, लहान मुलींचे अपहरण करून अपहरणकर्ते त्यांना आपले नाव देतात. त्यामुळे आजुबाजुच्यांना अपहरणकर्तेच पळवून आणलेल्या मुलांचे आई-वडील वाटतात. हे खरे वाटावे यासाठी अपहरणकर्ते पळवून आणलेल्या मुलांना शाळेत घालतात. त्याआधारे त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट इत्यादी आवश्यक सरकारी कागदपत्रे बनवून घेतात, त्यानंतर मुली वयात आल्या की, मुलींना डान्स बारमध्ये काम करण्यास किंवा देहविक्री करण्यास भागत पाडले जाते. त्यासाठी त्यांना परदेशातही पाठवले जाते.यात इमिग्रेशन अधिकारीही सहभागी असतात. ते ही अशा मुलींना बाहेर नेण्यास त्यांच्या एजंटना मदत करतात. (प्रतिनिधी)