बलात्काराच्या तीव्रतेनुसार भरपाई कशी ठरविता येईल?
By admin | Published: May 7, 2014 05:13 AM2014-05-07T05:13:50+5:302014-05-07T05:13:50+5:30
बलात्कार पीडितेला नुकसान भरपाई देताना कोणते निकष लावले जातात याची माहिती येत्या गुरूवारपर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले़.
हायकोर्टास हवे राज्य सरकारचे उत्तर
मुंबई : बलात्कार पीडितेला नुकसान भरपाई देताना कोणते निकष लावले जातात व त्या पीडितेवरील अत्याचार हा अत्यंत क्रूर होता हे कोणत्या आधारावर ठरवले जाते याची माहिती येत्या गुरूवारपर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले़.
न्या़ नरेश पाटील यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ न्यायालय म्हणाले, मुळात बलात्काराची तीव्रता कमी-जास्त ठरवणेच चुकीचे आहे़ एका पीडितेवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होते तर दुसर्या पीडितेवर क्रुरपणे अत्याचार झाला असा तर्क काढणे खेदजनक आहे़
कारण ॲसिड हल्ल्यातील पीडितेच्या शरीरावरील जखमांच्या आधारे हल्ल्याची तीव्रता लक्षात येऊ शकते़ मात्र बलात्काराच्या घटनेत प्रमाण ठरवले जाऊ शकत नाही़ तेव्हा बलात्कार पीडितांमध्ये फरक न करता सर्वांना समान रकमी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे़
तसेच नुकसान भरपाईसाठी पोलीस ठाण्यात पीडितेकडून अर्ज भरून न घेता तिच्या घरी जाऊन पोलिसांनी ही प्रक्रिया पूर्ण करायला हवी़ पोलीस ठाण्यात असा अर्ज भरून घेणे हा त्या पीडितेला शरमिंदे करण्यासारेखच आहे़ त्यामुळे आम्ही सुचवलेल्या या पयार्यांचा विचार शासनाने करावा, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले़
बलात्कार पीडितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका एका सामाजिक संघटनेने दाखल केली आहे़ त्यावरील सुनावणीत बलात्कार पीडितेला तीन लाख रूपयांपर्यंत नुकसान दिली जात असल्याचे सांगत शासनाने याचा तपशील न्यायालयाला दिला़ त्यावर तीन लाखांपर्यंत नुकसान भरपाई देताना काय निकष लावले जातात,अशी विचारणा न्यायालयाने सरकारी वकील शिंदे यांच्याकडे केली़ त्याचे उत्तर शिंदे यांना देता न आल्याने न्यायालयाने वरील आदेश दिले़ (प्रतिनिधी)