पदांसाठी लाचार कसे होता : डांगे
By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:55+5:302016-03-16T08:36:55+5:30
आयुष्यभर ज्यांना शिव्या घातल्या, त्यांच्याच पायाला पुन्हा लोणी लावण्याचे काम काही नेते करीत आहेत. एखाद्या समाजाचे नेतृत्व करताना पदांसाठी हे लोक लाचार कसे
सांगली : आयुष्यभर ज्यांना शिव्या घातल्या, त्यांच्याच पायाला पुन्हा लोणी लावण्याचे काम काही नेते करीत आहेत. एखाद्या समाजाचे नेतृत्व करताना पदांसाठी हे लोक लाचार कसे होतात? अशा पदांना लाथ मारून स्वाभिमानाने राजकारण करता आले पाहिजे, अशी टीका माजी मंत्री व राष्ट्रवादी नेते अण्णा डांगे यांनी रासपचे नेते महादेव जानकर यांचे नाव न घेता केली.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांसोबत रासपचे नेते महादेव जानकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी हजेरी लावली होती. याच राजकारणाचा धागा पकडत डांगे म्हणाले की, महाराष्ट्रात हे कसले राजकारण सुरू आहे? मंत्रिपदासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे.
दुष्काळाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे निर्णय चुकीचेच असले, तरी विरोधकांचा अकांडतांडवही काही बरोबर नाही. कॉँग्रेसनेही त्यांच्या सत्ताकाळात त्याच गोष्टी केल्या. विद्यमान मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या कारकीर्दीत असेच निर्णय घेतले होते. दुष्काळावर राजकारण करण्यापेक्षा एकत्रित येऊन प्रश्न सोडविला पाहिजे. यापूर्वीही १९७२ च्या दुष्काळावेळी आम्ही आंदोलने केली होती. विधिमंडळातील चर्चा बंद करण्यापर्यंतचे राजकारण कोणाच्याही हिताचे नाही, असेही डांगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)