Guidelines for Navratri: यंदा गरबा, दांडिया, नवरात्रोत्सव कसा साजरा करणार? सरकारच्या गाईडलाईन जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 04:15 PM2021-10-04T16:15:56+5:302021-10-04T16:17:11+5:30
Guidelines for Navratri: दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
येत्या 7 ऑक्टोबरपासून मुंबईसह राज्यभरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून उत्सव साजरा करू नये, योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. (Maharashtra Govt issued Guidelines for Garba, Dandiya and Navratri .)
कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता ४ फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फुटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षी प्रमाणे शक्यतो देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा, असे म्हटले आहे.
गरबा, दांडिया बाबत काय...
गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे / शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकत्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल.
देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/ इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.
दसऱ्याच्या दिवशी काय करणार...
दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरीता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.