कसा होणार विकास; कशी मिळणार हगणदरीमुक्ती?
By admin | Published: July 22, 2016 01:05 AM2016-07-22T01:05:36+5:302016-07-22T01:05:36+5:30
‘आमचा गाव-आमचा विकास’ यासाठी जिल्हा परिषदेत आयोजित कार्यशाळेकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनीच पाठ फिरवली.
पुणे : ‘आमचा गाव-आमचा विकास’ यासाठी जिल्हा परिषदेत आयोजित कार्यशाळेकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनीच पाठ फिरवली. अवघे २० ते २५ लोकप्रतिनिधीच उपस्थित होते. ‘गर्दी’ नसल्याने उपहासाने ‘दर्दी’ उपस्थित असल्याचे निवेदकाला म्हणावे लागले. त्यामुळे लोकप्रतिनिधीच जर हे गांभीर्याने घेत नसतील, तर कसा होणार गावाचा विकास व कधी मिळणार हगणदरीमुक्ती, असा सवाल उपस्थित होतो.
ग्रामपंचायतींना स्व-उत्पन्नाशिवाय आता १४व्या वित्त आयोगांतर्गत मोठा निधी मिळत आहे. या निधीतून गावांचा विकास करण्यासाठी ‘आमचा गाव-आमचा विकास’ अशी मोहीम शासनाने हाती घेतली असून, त्यासाठी पुढील ५ वर्षांचे आराखडे तयार करण्याचा सूचना प्रत्येक गावाला दिल्या आहेत. १५ आॅगस्टपर्यंत हे आराखडे तयार करून ग्रामसभेत मंजुरी घेऊन अंतिम करायचे आहेत. यासाठी जिल्हाभर ‘आमचा गाव-आमचा विकास’ या कार्यशाळा सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यातील १,४०७ ग्रामपंचातींना १४व्या वित्त आयोगांतर्गत सन २०१५-१६मध्ये एकूण ९५,६४,४२,७७५ रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदप्रमुख, सर्व गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी यांचे क्षमता बांधणी व प्रशिक्षण कार्यक्रम करण्यात आले असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांची प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवारी जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आली होती. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी ही कार्यशाळा होती.
मात्र, सदस्यच उपलब्ध नसल्याने सकाळी कार्यशाळा घ्यायची
तर कोणाची, असा प्रश्न आयोजकांसमोर उपस्थित झाला होता. काही लोक आल्याने ही र्कायाशाळा सुरू झाली.
पहिल्या सत्रात काही काळ सदस्य उपस्थित राहिले व निघून गेले. दुसऱ्या सत्रात तर २०० लोकांची व्यवस्था केली असताना कशाबशा पहिल्या दोन रांगाही भरल्या नाहीत, अशी परिस्थिती होती़ (प्रतिनिधी)
>गावाचे, जिल्ह्याचे जिथे योग्य नियोजन तेथे चांगला विकास होतो. त्यामुळे सर्वांनी नियोजनात पुढाकार घेणे गरजेचे आहे. आजच्या कार्यशाळेला मिळालेला प्रतिसाद पाहता मलाही खंत वाटते. माझी सर्वांना विनंती आहे की, आपण त्या गावाचे, गणाचे, गटाचे प्रमुख आहात. त्याच्या नियोजनात आपण सहभागी झाले पाहिजे. समजून घेतले पाहिजे. यासाठी वेळे दिला पाहिजे.
- प्रदीप कंद, अध्यक्ष, जिल्हा परिषद