PM मोदींसोबत कसे निर्माण झाले मधुर संबंध? 'त्या' 10 वर्षांचा उल्लेख करत पवारांनी आत्मचरित्रातून केले मोठे खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 11:33 AM2023-05-03T11:33:13+5:302023-05-03T11:33:51+5:30
Sharad Pawar : शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात विविध मुद्द्यांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेल्या संबंधांवरही प्रकाश टाकत अनेक मोठे खुलासे केले आहेत...
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद सोडण्यासंदर्भात घोषणा केली आहे. पवार हे 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पवार यांनी आपले आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी अध्यक्ष पद सोडण्यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात विविध मुद्द्यांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेल्या संबंधांवरही प्रकाश टाकत अनेक मोठे खुलासे केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संबंधांसंदर्भात काय म्हणाले पवार -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या संबंधांसंदर्भात एवढी चर्चा कशामुळे होते? यावर खुद्द शरद पवार यांनीच आपल्या आत्मचरित्रात भाष्य केले आहे. आत्मचरित्रात पवार लिहितात, "2004 ते 2014 या काळात आपण गुजरात सरकार आणि केंद्रात ब्रिजचे काम करत होतो. तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्या वेळी त्यांचे केंद्रातील सत्ताधारी काँग्रेससोबत फारसे चांगले संबंध नव्हते."
पवार पुढे लिहितात, ''या काळात केंद्र सरकार आणि गुजरात सरकार यांच्या चर्चा होत नव्हती. यामुळे गुजराती जनतेचे नुकसान होत होते. यामुळे मी पुढाकार घेतला आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत चर्चा केली. ते अत्यंत समजूतदार आणि परिपक्व नेते होते. कारण त्यांना हे समजत होते. यानंतर माझ्याकडे गुजरात आणि केंद्र यांच्या संवाद प्रस्थापित करण्याची जबाबदारी देण्यात आली. माझ्या आणि नरेंद्र मोदी यांच्यातील चांगल्या संबंधांबद्दल बरेच काही बोलले जाते. ये संबंध मी 10 वर्षांपर्यंत केंद्रात प्रतिनिधीत्व करत असताना निर्माण झले आहेत.''
एवढेच नाही तर, राजकीय आणि प्रशासनिक कामे करत असताना संवाद आवश्यक आहे. उच्च पदावर असलेल्या लोकांनी संवादापासून परावृत्त होऊ नये. यामुळे संपूर्ण देशाचेच नुकसान होते. मुख्यमंत्र्याच्या रुपात नरेंद्र मोदी यांचा संवाद फारच कमी होता, असेही शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.