चर्चा बाहेर जातेच कशी?, उद्धव ठाकरे यांनी दिले चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:08 AM2017-09-20T07:08:02+5:302017-09-20T07:08:04+5:30
शिवसेना आमदार-खासदारांच्या ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीची माहिती बाहेर जातेच कशी, असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला असून माहिती बाहेर कशी गेली, याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे समजते.
अतुल कुलकर्णी
मुंबई : शिवसेना आमदार-खासदारांच्या ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीची माहिती बाहेर जातेच कशी, असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला असून माहिती बाहेर कशी गेली, याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे समजते.
सोमवारी ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीचा वृत्तांत माध्यमांपर्यंत पोहोचल्याने उद्धव यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत घडलेल्या प्रकाराबाबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे तीव्र नापसंती व्यक्त केली. आपला तोल गेला, कोणाला दुखवायचे नव्हते, असे सांगत बारणे यांनी उद्धव यांची माफी मागितली. उद्धव यांच्या सांगण्यावरून बारणे यांनी आ. नीलम गोºहे यांना फोन केला. त्यानुसार उभयतांचे फोनवर बोलणे झाल्यानंतर, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे संयुक्त निवेदन त्यांनी प्रसारमाध्यमांना दिले.
उद्धव ठाकरे पक्षाच्या आमदारांना भेटून त्यांची गाºहाणी ऐकणार होते. पण ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.
भाजपा पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू असल्याचे विधान खा. संजय राऊत यांनी केले होते. त्यावर सेनेच्या आमदारांमध्ये तीव्र पडसाद उमटले. राऊत यांना लोकांमधून निवडून यायचे नाही. आम्हाला जनतेला सामोरे जावे लागते. तेव्हा त्यांनी भान ठेवून बोलावे, असे काही आमदारांनी म्हटले आहे.
आम्ही अल्टीमेटच ! - मुख्यमंत्री
शिवसेनेने दिलेल्या अल्टीमेटमवर आपली भूमिका काय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, आम्ही अल्टीमेटच आहोत, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली.