डॉक्टर संपावर गेलेच कसे? - हायकोर्ट
By admin | Published: July 14, 2015 01:21 AM2015-07-14T01:21:49+5:302015-07-14T01:21:49+5:30
डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच दिले होते; तरीही विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टर संपावर
मुंबई : डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच दिले होते; तरीही विविध मागण्यांसाठी निवासी डॉक्टर संपावर गेलेच कसे, असा सवाल उपस्थित करीत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला सोमवारी फटकारले. डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याने याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला दिले.
राज्यभरातील सुमारे ४ हजार निवासी डॉक्टर विविध मागण्यांसाठी जुलैच्या पहिल्याच आठवड्यात संपावर गेल होते. सरकारने मध्यस्थी केल्यानंतर दोन दिवसांनी डॉक्टरांनी संप मागे घेतला. या संपाविरोधात अॅड. दत्ता माने यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
डॉक्टरांच्या संपाचा भुर्दंड नागरिकांनी का सहन करायचा? डॉक्टर संपावर जाणार नाहीत याची काळजी घेण्याची आदेश न्यायालयाने तीन वर्षांपूर्वीच दिले होते. तरीदेखील डॉक्टर संपावर गेले, याचा अर्थ हा प्रश्न हाताळण्यात शासन यंत्रणा फोल ठरली आहे. त्यामुळे याचा खुलासा शासनाने प्रतिज्ञापत्राद्वारे करावा, असे आदेश देऊन न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली. (प्रतिनिधी)