जाहीरनाम्याची चोरी कशी झाली?
By admin | Published: January 20, 2017 12:14 AM2017-01-20T00:14:59+5:302017-01-20T00:14:59+5:30
आपल्या जाहीरनाम्याला पाय कसे फुटले, जाहीरनाम्यातले मुद्दे शिवसेनेने आजच कसे जाहीर करुन टाकले
अतुल कुलकर्णी,
मुंबई- आपल्या जाहीरनाम्याला पाय कसे फुटले, जाहीरनाम्यातले मुद्दे शिवसेनेने आजच कसे जाहीर करुन टाकले यावरुन भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये संशयकल्लोळ नाट्य रंगलेले असताना आमच्यावर लक्ष ठेवून असलेल्या भाजपाने आमच्या घोषणेनंतर तात्काळ ‘आम्ही हे करणारच होतो’ अशी भूमिका घेतल्याचे शिवसेना म्हणत आहे. एका घोषणेने शिवसेनेने भाजपा नेत्यांनी आजवर धरलेल्या ताठरपणातील हवाच काढून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
उध्दव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर हडबडलेल्या भाजपा नेत्यांनी ‘आमच्या जाहीरनाम्याचे काम गेले १५ दिवस सुरु होते, ते पूर्ण झाले आहे’, असे सांगण्यासाठी पत्रकारपरिषद बोलावली. राज्य सरकारकडे अधिवेशनामध्येच आमदार म्हणून आपण ६०० स्क्वे फुटाच्या खालील घरावर टॅक्स लागू नये अशी मागणी केल्याचे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले. मात्र आम्ही सत्तेत आहोत, मागण्या करत बसत नाही, आम्ही घोषणा करतो आणि त्या अंमलात आणतो असे टोकदार उत्तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले गुजराती समाजाचे नेते हेमराज शहा यांनी भाजपाला सुनावले. जर शेलार यांनी ६०० स्वे. फुटाच्या घरांना करमाफी द्यायची होती तर त्यांनी आधीच हे का जाहीर केले नाही, उध्दव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर आम्हीच ही मागणी केली होती या म्हणण्याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात, असेही शहा यांनी सुनावले. शहा गुजराती समाजाचे नेते आहेत. त्यामुळे हा आहेर भाजपाला चांगलाच झोंबणारा आहे.
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त
आणि चांगले होईपर्यंत स्ट्रीट टॅक्स घ्यायचा नाही असे आमच्या जाहीरनाम्यात आहे, आमच्यामुळेच ठेकेदार गजाआड गेले, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असेही शेलार म्हणाले. मात्र मुंबईच्या रस्त्यांची अवस्था केवळ ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमुळे झालेली नाही. स्टँडींग कमिटीत ‘अंडरस्टँडींग’ होताना भाजपाही सहभागी नव्हती का? फक्त ठेकेदारांना बळीचे बकरे बनवताना त्यांच्यांशी कोणी किती ‘अंडरस्टँडींग’ केले याची चौकशी कोण करणार असे एका ठेकेदाराने आपले नाव न सांगता बोलून दाखवले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपा महापालिकेच्या भ्रष्ट कारभारातून स्वत:ला कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असली तरी त्यांची त्यातून सुटका होताना दिसत नाही. स्वत: सत्तास्थानी असतानाही मुंबई महापालिकेत टॅक्स टेररीझम सुरु आहे असे विधान करत भाजपाने स्वत:ला पालिकेच्या कारभारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कसा काय करु शकते असे मत सेनेच्याच एका नेत्याने व्यक्त केले. ३४ हजार कोटीचा अर्थसंकल्प आणि २५ हजार कोटींच्या बँक ठेवी असलेल्या महापालिकेत टॅक्स टेररीझम सुरू आहे ते बदलल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे म्हणणे म्हणजे सत्तेचे फायदे घेऊन पुन्हा विरोधात बोलणे होत नाही का? असा सवालही त्या नेत्याने केला.