भारतात बंदी असताना इराणमधून पंढरपुरात मेलामाईन आले कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:38 AM2020-01-21T11:38:02+5:302020-01-21T11:39:56+5:30
राज्यातील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी चक्रावले; मास्टर मार्इंडचा शोध सुरू
राजकुमार सारोळे
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथील दूध केंद्रावर मारलेल्या छाप्यात सापडलेल्या मेलामाईनच्या साठ्यामुळे राज्यातील अन्न व औषध प्रशासन हादरले आहे. या पदार्थाला भारतात बंदी असताना इराणहून आयात कशी झाली, याचा शोध आता सुरू झाला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी रात्री सुगाव भोसे येथील श्रीराम दूध केंद्रावर छापा मारून रसायन वापरून तयार करण्यात आलेले ६३८ लिटर कृत्रिम दूध व असे दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे विविध प्रकारचे २ हजार ७१९ किलो रसायन जप्त केले आहे. यामध्ये ५० किलो मेलामाईन आढळले आहे. मेलामाईन या रसायनाला भारतात उत्पादन व वापरास बंदी आहे. त्यामुळे इतर देशातून या पदार्थाची आयात करता येत नाही. असे असताना पंढरपुरात हे रसायन कुठून आले, याचा शोध घेण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन बंदी असलेल्या रसायनाचा खाद्यपदार्थांमध्ये वापर होऊ नये, यासाठी दक्ष असते. मेलामाईनच्या वापराबाबत खास दक्षता बाळगली जाते. महाराष्ट्रात दूध डेअरीचे प्रमाण जास्त असल्याने दुग्धजन्य पदार्थांवर लक्ष ठेवण्याच्या सक्त सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या आहेत. राज्यभरातून मेलामाईनचा वापर नाही, असा अहवाल असताना पंढरपुरात दूध भेसळीत हा पदार्थ आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अशी होते दूध भेसळ
- मेलामाईन पाण्यात टाकल्यावर दुधासारखे दिसते. श्रीराम दूध केंद्राचा चालक डॉ. चव्हाण कॅनमध्ये हे मिश्रण तयार करायचा. त्याला दुधासारखी चव येण्यासाठी दूध पावडर व इतर पदार्थ मिसळत असे. त्यानंतर चांगल्या १५ लिटर दुधात असे रसायनापासून तयार केलेले ४० लिटर मिश्रण टाकले जायचे. १५ लिटर दुधाला ५५ लिटर भेसळीचे दूध तयार करण्याचा. तो स्वत: जनावरांचा डॉक्टर असल्याने त्याला भेसळयुक्त दूध कसे बनवायचे याचे तांत्रिक ज्ञान असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे राऊत यांनी सांगितले.
काय आहे मेलामाईन
- मेलामाईन हे कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजनचा फॉर्म्युला आहे. या तिन्हींचे मिश्रण तयार केल्यावर साइनामाईड या विषारी द्रव्याप्रमाणे हे काम करते. पण नायट्रोजनचे प्रमाण ६७ टक्के केल्यावर प्लास्टिक साहित्य निर्मितीस याचा उपयोग होतो. शोभेचे प्लास्टिक काम, फोम, बोर्ड, भांडी यासाठी या प्लास्टिकचा वापर शक्य आहे. पण फॉर्म्युल्यापासून बनविलेली पावडर खाद्यपदार्थात वापरली जाते. या पावडरला मेलामाईन असे संबोधले जाते. याच्या वापराने मानवाच्या किडनी, त्वचा व डोळ्यांवर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे मेलामाईनच्या वापरास भारतात बंदी असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले.
सध्या इराणवरून तस्करी
- सध्या इराण या आखाती देशातून मेलामाईनची तस्करी केली जाते. त्यामुळे भारतीय सीमारक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाची यावर करडी नजर आहे. असे असताना हा पदार्थ पंढरपूरपर्यंत पोहोचला, ही बाब अत्यंत गंभीर आहे. ज्याने हा पदार्थ डेअरीचालक डॉ. चव्हाण याला पुरविला त्याचे नाव निष्पन्न झाले आहे. त्याबाबत पोलिसांमध्ये सविस्तर तक्रार दिली आहे. पोलीस तपासात आता ही बाब स्पष्ट होईल, असे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी सांगितले.